Sanjay Raut : मोदी सरकारने सर्वसामान्यांचा मोठा झटका देत घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ (LPG Price Hike) केली. सरकारी तेल कंपन्यांच्या यानिर्णयावर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांना सरकारला घेरण्याची आयतीच संधी मिळाली आहे. आज या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. तसेच भाजप खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना खास ऑफर दिली. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गॅस दरवाढीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.
पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, तो टॅरिफचा परिणाम आहे की नाही हे मला माहीत नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल गॅसच्या किंमती का वाढाव्यात ही कसली वसुली चालू आहे? भारतासारख्या देशांमध्ये निर्मला सीतारमण या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचे काम करत आहेत. माझे आवाहन आहे स्मृती इराणी आणि कंगना राणावत यांना स्मृती इराणी यांना आमंत्रित करतो आमच्या आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व करावं. हा राजकीय प्रश्न नसून गृहिणींच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सिलिंडर आम्ही पुरवू तुम्ही फक्त आता रस्त्यावर बसायला या अशा प्रकारचे आंदोलने शिवसेना करत आली आहे असे राऊत म्हणाले.
Video : मंगेशकर रूग्णालयाच्या केळकरांनी राहू-केतू काढताच राऊतांनी संपूर्ण कुंडलीच मांडली
भारतासारख्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयांवर स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान चारशे रुपयांनी खाली आणायला पाहिजेत. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका अर्थशास्त्र आम्हालाही कळतंय. या देशांमध्ये प्रत्येक बाबतीत सामान्य माणसांची लूट सुरू आहे. निवडणुका आल्या की एखादी लाडक्या बहिणींसारखी योजना आणायची चार महिने राबवायची आणि नंतर वाऱ्यावर सोडून द्यायची असे प्रकार सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.
यानंतर खासदार राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही टीका केली. एकनाथ शिंदे यांची कोंडी वगैरे हा काही विषय नाही त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं अस्तित्व नाही. ठाण्यामधल्या विधानसभेतल्या जिंकलेल्या या जागा फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे यांमुळे जिंकल्या आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली.