Download App

“उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर नारायण राणेंची जेलमधून सुटका, थेट अमित शाहांनी..”, राऊतांचा राणेंवर पलटवार

Sanjay Raut replies Narayan Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला माझ्या मुलाचे नाव दिशा सालियन मृत्यू प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला होता. काल राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले होते. परंतु, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा दावा साफ नाकारला आहे. राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे ज्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना नारायण राणे यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले. त्यावर राऊत यांनी स्पष्ट शब्दांत इनकार केला.

उद्धव ठाकरेंमुळेच राणे सुटले : संजय राऊत

नारायण राणे इतक्या वर्षांनंतर कशाच्या आधारावर असे वक्तव्य करत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी आता सत्तरी पार केली आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटते. नारायण राणे यांना ज्यावेळी अटक झाली त्यावेळी त्यांच्याच कुटुंबियांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यांना सांभाळून घ्या. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना काही त्रास होत आहे. इतकेच नाही तर थेट केंद्रातूनही फोन आला होता. नारायण राणे यांच्या सुटकेसाठी अमित शाह यांचाही फोन आला होता. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना केल्या आणि नारायण राणेंची सुटका झाली असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला.

दिशा सालियन प्रकरण : ठाकरेंच्या दोन फोनचे संभाषण सांगत राणेंनी ठेवणीतले ‘पत्ते’ उघडले

काय म्हणाले होते नारायण राणे?

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धक्कादायक खुलासे केले. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता असा दावा राणे यांनी केला होता. वांद्रेच्या पुढे असताना मिलींद नार्वेकरांचा फोन आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलले. त्यानंतर रुग्णालयाच्या परवानगीवेळी त्यांच्याशी बोलणे झाले. दोन्ही वेळा उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात आदित्यचं नाव घेऊ नका असे सांगितल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता.

दुसऱ्या कॉलवेळीही तीच विनंती

नारायण राणे यांनी दुसऱ्या कॉलबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले, दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच नाव घेऊ नका अशी विनंती करणारा दुसरा कॉल आला होता. दुसरा फोन कोरोनाच्या काळात आला होता. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे होती. त्या संबंधित ती परवानगी मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी आदित्यचं नाव घेऊ नका अशी पुन्हा एकदा त्यांनी विनंती केली. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा असंही ते आपल्याला म्हणाल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं.

follow us