Download App

Asia Cup : भारत विरुद्ध INDIA वादाने टीमचे अभिनंदन : मॅच संपताच नेत्यांची राजकीय बॅटिंग

Asia Cup win : भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली असून अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने चषकावर आठव्यांदा नाव कोरलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला असून चषकावर नाव कोरताच भारतीय संघाकडून जल्लोष करण्यात येत आहे.

या विजयानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंचे देशभरातून कौतुक होत आहे. प्रत्येकजण आपापल्या खास पद्धतीने टीम इंडियाचे अभिनंदन करत आहे. पण या दरम्यान ‘भारत विरुद्ध इंडिया’ असा अनोखा शुभेच्छांचा पॅटर्नही पाहायला मिळाला. काही नेते इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना दिसले, तर काही नेत्यांनी संघाचे अभिनंदन करण्यासाठी आवर्जून ‘भारत’ हा शब्द वापरला.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी इंडिया शब्द वापरत केलं अभिनंदन :

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संघाचे अभिनंदन करताना ‘इंडिया’ हा शब्द दोनदा वापरला. ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले की, आशिया चषक स्पर्धेत इंडियाच्या शानदार विजयाबद्दल आणि मोहम्मद सिराजच्या सर्वात वेगवान 5 बळी घेण्याच्या विश्वविक्रमाचे हार्दिक अभिनंदन. इंडिया जिंकत राहतो, असंही त्यांनी आवर्जून म्हंटल्याचं पाहायला मिळालं.

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीमचे अभिनंदन करताना INDIA हा शब्द वापरला आहे. टीम इंडियाने अविस्मरणीय कामगिरी केली आणि श्रीलंकेवर 10 गडी राखून शानदार विजय मिळवून जेतेपद पटकावले, असे त्यांनी म्हंटले.

इंडियाने #AsiaCup2023 चे विजेतेपद पटकावले, असं म्हणतं काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी टीमचे अभिनंदन केले. श्रीलंकेविरुद्धच्या शानदार विजयासाठी इंडियन क्रिकेट संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा, असेही ते म्हणाले.

भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांकडून भारतीय टीमचे अभिनंदन :

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया हा शब्द न वापरता ट्विट करत ‘भारतीय’ क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. हा विजय ऐतिहासिक आहे. त्यांनी आम्हाला तुमचा अभिमान आहे, असेही त्यांनी पुढे म्हंटले.

विजयाचे अभिनंदन करण्यासाठी भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींचा फोटोही वापरला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले ‘भारताचे’ अभिनंदन

याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही विजयासाठी संघाचे अभिनंदन केले आणि भारत हा शब्द वापरला. त्यांनी लिहिले की, आपण पुन्हा एकदा आशियाई चॅम्पियन आहोत. श्रीलंकेवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवून 8व्यांदा आशिया कप जिंकल्याबद्दल भारताचे अभिनंदन.

इंडिया विरुद्ध भारत वाद काय आहे?

इंडिया विरुद्ध भारत हा संपूर्ण वाद खरंतर G20 च्या जेवण कार्यक्रमच्या निमंत्रणावरून सुरू झाला. G-20 शिखर परिषदेच्या जेवण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘President of India’ ऐवजी ‘President of Bharat’ असे लिहिले होते. निमंत्रण पत्र पाहिल्यानंतर मोदी सरकार देशाच्या नावात इंडिया हा शब्द वापरणे बंद करून केवळ भारत म्हणण्याचा डाव आखत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. इंडियाचे नाव बदलून भारत असे व्हावे यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

Tags

follow us