काल छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
पण या सभेनंतर आता चर्चा सुरु आहे ती उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या ‘स्पेशल ट्रीटमेंट’ची. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर सोबतच अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडेच राहणार अशी देखील शक्यता वर्तवल्या जात आहेत.
मोठी बातमी ! पुण्यात नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी.. मुश्रीफांच्या अडचणी वाढणार
महाविकास आघाडीचा या सभेत महाविकास आघाडीतील सर्वच नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे सगळे नेते उपस्थित असताना देखील व्यासपीठावर इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती.
राज्यभरात महाविकास आघाडीकडून एकत्रित काही सभा घेतल्या जाणार आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरची ही पहिली सभा होती. या सभेचे आयोजन शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्याकडे होते. त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांना मोठी खुर्ची दिली गेली असेल. शिवसेनेमध्ये आजवर ठाकरे कुटुंबाना मोठी खुर्ची दिली जाते. त्याच प्रमाणे महाविकास आघाडीच्या सभेतही इतर नेत्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांना अशी मोठी खुर्ची देणं सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा जाहीर झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची मोठी चर्चा सुरु होती. त्या चर्चेमध्ये अजून एक कारण समाविष्ट झालं होत ते म्हणजे राहुल गांधी यांचा फोटो सभेच्या बॅनरवरून गायब झाल्याची. काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सभेच्या बॅनरवरून राहुल गांधी यांचा फोटो गायब होता.
पण याच सभेच्या मध्यभागी उद्धव ठाकरे यांचा मोठा फोटो पाहायला मिळाला. सभेच्या व्यासपीठावर अगदी मध्यभागी उद्धव ठाकरे यांच्या या फोटोमुळे सभेमध्ये उद्धव ठाकरेच सर्वाधिक चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं.
Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?
शिवसेनेच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे कायम उशिरा येतात, शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे सर्व नेत्यांची भाषणे झाल्यानंतर उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळी येतात. काल महाविकास आघाडीची सभा असताना देखील उद्धव ठाकरे उशिरा आले. ज्यावेळी उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले तेव्हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरु होते.
पण अचानक उद्धव ठाकरे व्यासपीठावर आल्यामुळे अशोक चव्हाण यांना सुरुवातीला बोलत राहावं की थांबावं, असा प्रश्न पडलेला दिसला. त्यानंतर त्यांना आपलं भाषण उरकत घ्यावं लागलं. अगदी अजित पवार यांनीही आपलं भाषण लवकर आवरतं घेतलं आणि उद्धव ठाकरे यांना जास्त बोलण्यास वेळ दिला.
यामुळे महाविकास आघाडीची सभा असली तरी यात उद्धव ठाकरे यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळाली आणि सभेमध्ये उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील, अशी शक्यता सोशल मीडियावर वर्तवली जात आहे.