Download App

गड राखण्यासाठी CM शिंदेंचा राज्यभर दौरा; खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभांचं नियोजन

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)

Cm Eknath Shinde Tour :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून (Shinde Group) जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी कंबर कसली आहे. येत्या 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री शिंदेंचा राज्यव्यापी दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे आता भाजपकडून घोषणा करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या खासदारांसाठी रिंगणात उतरल्याचं बोललं जात आहे.

तानाशाही प्रवृत्तीच्या भाजपमुळं लोकशाही धोक्यात; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

गेल्या काही दिवसांपासून सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चांना उधाण आलं आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीत ओढाताण सुरु असल्याची परिस्थिती आहे. शिवसेना जेवढ्या जागा लढवणार तेवढ्याचं जागांसाठी अजित पवार गटही दावा ठोकणार आहे. महायुतीमध्ये शिवसेनेनी जेवढ्या जागा लढवल्या होत्या तेवढ्या जागा लढवणार असल्याचं शिंदेंकडून जाहीर करण्यात आलं आहे. एकंदरीत या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यभर दौरा आखला आहे.

एकनाथ शिंदे यांचा ६ जानेवारीपासून राज्यव्यापी दौरा दौरा सुरु होणार असून 6 जानेवारीला यवतमाळ-वाशिम, 8 जानेवारीला अमरावती-बुलढाणा, 9 जानेवारीला हिंगोली-धाराशिव, तर 10 जानेवारीला परभणी-छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर 21 जानेवारीला शिरुर-मावळ, 24 जानेवारीला रायगड-रत्नागिरी, आणि 25 जानेवारीला शिर्डी-नाशिक, 29 जानेवारीला कोल्हापूर आणि 30 जानेवारीला हातकणंगलेमध्ये शिंदे यांचा दौरा असणार आहे.

Pune : समोर आप्पा बारणे असो की पार्थ पवार, चितपट करणारच! उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच वाघेरेंची डरकाळी

या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे राम मंदिर सोहळा आणि आगामी लोकसभा निवडणुकांबाबत आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिंदे ज्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. ते सर्व लोकसभा मतदारसंघ युती काळात शिवसेनेने लढवले आहेत. यातील सर्व जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत.

शिंदे यांच्या दौऱ्यात ठाणे-कल्याण या मतदारसंघाचा समावेश नाही. कल्याण हा शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. तर ठाणे हा भाजपला हवा आहे. तसेच नाशिकसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. अशा परिस्थितीत जागावाटपात शिंदे यांच्या काही घटक पक्षांचीही दावेदारी अपेक्षित आहे. असं असताना आपल्या जागांवर दावेदारी अधिक भक्कम करणे शिंदे यांना गरजेचे असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी यासाठी काही खासदारांचा आग्रह आहे. पण युतीत निवडणूक होणार असल्याने भाजपचे चिन्ह आपोआप मिळेल हे शिंदे समर्थकांचे म्हणणे आहे. शिंदे यांचा हा राज्यव्यापी दौरा असला तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या उर्वरित 28 मतदारसंघाचा या दौऱ्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे यांचा हा दौरा महायुतीसाठी नसून शिंदे गटाच्या खासदाराची जागा अधिक भक्कम करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

कालच देवेंद्र फडणवीस यांचा राज्यव्यापी दौरा होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. फडणवीस यांचा दौरा 48 मतदारसंघात असल्याचं बोललं जात होतं. त्यांनंतर लगेचच शिंदे यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे यांचा हा दौरा महायुतीपेक्षा शिवसेना खासदारांची दावेदारी अधिक
मजबूत करण्यासाठी असल्याचं बोललं जात आहे.

follow us