प्रतिनिधी – अशोक परुडे
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke: नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक राजकारणात भाजपविरोधात महाविकास आघाडीत जोरदार लढत रंगणार आहे. त्याची झलकही दोन्ही बाजूच्या झालेल्या मेळाव्यात दिसून येत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे दक्षिणच जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. परंतु चर्चा मात्र भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे, राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांची सुरू झाली आहे.
नगरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही शिवाजी कर्डिले यांच्यात ताब्यात होती. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने काही बाजार समित्यांवर प्रशासक नेमले होते.त्यात नगर बाजार समिती होती. कर्डिले यांनी बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यावेळी केला होता.
बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगर तालुक्यातील राजकारण पेटले आहे. कर्डिलेंविरोधात नगर तालुक्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात. या निवडणुकीतही कर्डिलेंविरोधात महाविकास आघाडीची नेते एकत्र आले आहे. या निवडणुकीत कर्डिले यांच्या पाठीशी खासदार सुजय विखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर कर्डिलेंनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळविले आहे. कर्डिले यांना पुन्हा बाजार समिती जिंकायची आहे. कर्डिले, विखे,श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते हे असे एकत्र आले आहे.
Sujay Vikhe : ‘काल आलेले नेते विकासाच्या गप्पा मारतात’; विखेंचा लंकेंवर निशाणा..
तर कर्डिले, विखेंविरोधात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे शशिकांत गाडे,राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, काँग्रेसचे प्रताप शेळके असे एकत्र आले आहे. हे सर्व नेते कर्डिले यांना गेल्या काही वर्षांपासून घेरत आहेत. जिल्हा बँकेतील पराभवाचे उट्टे काढायचे असेल तर कर्डिलेंना या निवडणुकीत धक्का दिला पाहिजे, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.
अरविंद केजरीवाल आजचे गांधी! भाजप त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, राघव चढ्ढा यांचा हल्लाबोल
पण गेल्या दोन दिवसांत कर्डिलेंची मैदान असलेल्या नगर तालुक्यात खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांची राजकीय कुस्ती रंगत येत आहे. काल महाविकास आघाडीच्या मेळाव्यात लंकेच्या निशाणावर खासदार विखे हे होते. सकाळी उठल्यापासून माझ्या नावाचा जप करत आहेत. असे राजकारण होत नाही.मी जशास तसे उत्तर देणारा राजकारणी आहे. निलेश लंके एवढा सोपा नाही. विरोध सुरू केला, तर शेवट करतोच. माझी यंत्रणा आहे ती रात्री बाराला सुरू होते.हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत लंके यांनी विखेंना चॅलेंज दिले आहे.
लंकेंनाही विखेंनी आजच्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला आज सत्ता मिळालेली नाही. काही जण काल आले आणि विकासाच्या गप्पा मारायला लागले आहेत. सुजय विखे बोलून नाही गप्प राहून पराभव करणारा दाखविणारा आहे. वाळूचे हप्ते बंद केल्याने यांची अक्कल बंद झाली. यांचे उलटे उद्योग बंद झाल्याचा आरोप विखे यांनी लंकेंवर केला आहे.
भाजपच्या भीतीने हे तिन्ही पक्ष एकत्र; चंद्रकांतदादांचा मविआवर हल्लाबोल
बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार, खासदारांनी एकमेंकावर केलेली टीका, आरोप हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने असल्याचे बोलले जात आहे. तसे नगर तालुक्यातील बाजार समिती व इतर निवडणुकीचे मैदान कर्डिलेविरोधात महाविकास आघाडीतील तालुक्यातील नेते अशी असते. पण आता या मैदानात खासदार विखे आणि निलेश लंके यांची कुस्ती सुरू झाली आहे. बाजार समितीची कुस्ती जिंकण्यात हे नेते किती ताकदीचे ठरतात. हे निवडणुकीनंतरच समजेल. तोपर्यंत राजकीय घमासान सुरूच राहणार आहे.