LetsUpp Exclusive : राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडेच; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला लागणार ब्रेक ?

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ( DCM Sunetra Pawar) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

Sunetra Pawar Ncp Chief

Sunetra Pawar Ncp Chief

प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Sunetra Pawar to take over as NCP chief soon: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचे (NCP) सूत्र कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे. पार्थ पवार, सुनेत्रा पवार या दोघांपैकी एकाकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, अशा शक्यता वर्तविले जात होती. पण आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ( DCM Sunetra Pawar) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली जाईल, असे पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्षपदाबाबत औपचारिक घोषणा होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जाते. आवश्यक संघटनात्मक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एकमताने अध्यक्ष निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना आणि अंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यावर पक्षाचे लक्ष केंद्रीत आहे.


दोन्ही राष्ट्रवादीच्या
विलिनीकरणावर संभ्रम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत परस्परविरोधी दावे होत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून अधिकृतरित्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे सांगितले जात आहेत, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून विलिनीकरणाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही असा प्रस्ताव आल्यास योग्य त्या व्यासपीठावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अशी भूमिका मांडली आहे. मात्र, तत्कालीन अध्यक्ष अजित पवार यांनी विलिनीकरणाचा विषय अधिकृतरीत्या कधीच पुढे आणला नव्हता, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे खरे कोण बोलत आहे? हा प्रश्न कार्यकर्ते आणि जनतेत उपस्थित होत आहे.


दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाला ब्रेक?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर विलिनीकरणाच्या चर्चेला सध्या ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार विराजमान झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा मुद्दा मागे पडू शकतो, असे संकेत मिळत आहेत. सध्या दोन्ही पक्षांचे अध्यक्ष वेगळे आहेत. त्यातच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका होत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पक्ष संघटना सक्षम ठेवण्याची जबाबदारी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवरील टीका नव्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून कितपत सहन केली जाईल, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. पक्षातील सूत्रांच्या मते, या नेत्यांची बदनामी म्हणजे पक्षाचीच प्रतिमा धुळीस मिळवण्यासारखी ठरू शकते.त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर वाढले जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे विलिनीकरण सध्याच्या घडीला अशक्यप्राय मानले जात आहे. नेतृत्वबदलानंतर संघटन बळकटीकरणावर भर दिला जाण्याची शक्यता असून, विलिनीकरणाचा मुद्दा किमान निकट भविष्यात तरी पुढे येण्याची चिन्हे दिसत नाहीत.


विमान अपघाताची चौकशी AAIB संस्थेकडून

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री असताना प्रफुल पटेल यांनी स्थापन केलेली त्रयस्थ आणि स्वायत्त तपास यंत्रणा Aircraft Accident Investigation Bureau — म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्याकडे या अपघाताची चौकशी सोपवण्यात आली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ही संस्था नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रशासकीय चौकटीत कार्यरत असली तरी तपास प्रक्रियेत स्वतंत्र आणि तांत्रिकदृष्ट्या स्वायत्त मानली जाते.

Exit mobile version