Sunetra Pawar will meet Prime Minister Modi along with her family : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता नवा आणि गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. हा अपघात नसून घातपात असू शकतो, अशी शंका पवार कुटुंबीयांनाही वाटत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
या भेटीत अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणात सीबीआयर्फत तपास करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. यासोबतच व्हीएसआर कंपनीच्या सर्व विमानांना तात्पुरती बंदी घालावी, अशीही मागणी पवार कुटुंबियांकडून केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानांवर बंदी घालण्यात आली असली तरी कंपनीची इतर विमानं अद्याप सुरू आहेत, याबाबत देखील कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकरणात यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी देखील गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणाचा मोठा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भात रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
Supriya Sule : कमी बोलायचं अन् कान उघडे ठेवायचे; खासदार सुप्रिया सुळेंकडून भाच्याला कानमंत्र…
आता मात्र या प्रकरणात पवार कुटुंबियांना देखील अपघाताबाबत संशय असल्याची माहिती समोर आल्याने रोहित पवार यांच्या आरोपांना एकप्रकारे दुजोरा मिळतोय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी देखील हा अपघात नसून घातपात असू शकतो अशी शंका असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार पंतप्रधानांची भेट घेण्याच्या तयारीत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. संध्याकाळपर्यंत ही भेट होण्याची शक्यता असून विमान अपघात प्रकरणातील एआयआबीच्या अहवालातील त्रुटींवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा प्रसंग अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत, सत्य भारे येण्यासाठी निष्पक्ष चौकशी होणे आवशयक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
