Sunil Tatkare : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावर बोलतांना प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या खेळींचा जास्त विचार केला तर डोकं फुटून जाईल. काका-पुतणे महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत बच्चू कडू मोठे नेते आहेत, त्यावर मी काय बोलावं, असा उपहासात्मक टोला लगावला.
आज माध्यमांशी संवाद साधतांना सुनील तटकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना बच्चू कडू यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, बच्चू कडू सारख्या मोठ्या माणसांनी काही प्रतिक्रिया दिली, यावर मी काय बोलावं? बच्चू कडूंपुढे मी फारच छोटा कार्यकर्ता आहे. ते मोठे आहेत. मी पंचवीस वर्ष जरी आमदार राहिलो असलो किंवा लोकसभेला निवडणूक लढलो असलो तरी मी लहान आहे. बच्चू कडू मोठे नेते आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवार हे पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं. त्याला शऱद पवारांनी यात कोणताही वाद नाही, असं म्हणत दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार एनडीएत सामील होणार अशी चर्चा सुरू झाली आणि लगेच पवारांनी आपण असं म्हणालोच नाही, असं घुमजावं केलं. त्यानंतर बच्चू कडूंनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.
काय म्हणाले बच्चू कडू?
शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे म्हणतात ते कधीच करताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची खेळी पाहिली तर मी एवढेच म्हणू शकतो की, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे किंवा कार्यकर्त्यांचे डोके फुटू नये. काका-पुतणे अख्खा महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत, हे सूर्यप्रकाशाइतकं खरं आहे, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.
त्यानंतर शऱद पवारांनी बच्चू कडूंचा चांगलाच समाचार घेतला. बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चारवेळी महाराष्ट्राचा सीएम होतो. केंद्रात महत्वाची जबाबदारी होती. तुम्ही तर मला कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मागाल, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं.