Sushilkumar Shinde on Delimitation: सोलापूर : देशात सध्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. अशातच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी डिलिमिटेशनबाबत आपलं वैयक्तिक मत मांडलं आहे. डिलिमिटेशन होणं गरजेचं आहे, मात्र सरकारने हे विधेयक आणण्याची पद्धत चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, लोकसंख्या वाढत असल्याने लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली पाहिजे. बराच काळ उलटला असून डिलिमिटेशन होणं आवश्यक आहे. मात्र, हा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांच्या संमतीने झाला असता, तर अधिक चांगलं झालं असतं. जनगणनेनंतरच डिलिमिटेशन व्हावं, ही काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘डिलिमिटेशन आणण्याची सरकारची पद्धत चुकीची’
डिलिमिटेशन व्हायला हवं, पण सरकारने ज्या पद्धतीने हे विधेयक आणलं आहे, त्याच्याशी आपण सहमत नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत विचारलं असता, तो वेगळा पक्ष असल्याने त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संविधानाला धोका पोहोचण्याची भीती
दरम्यान, द्रविड प्रांताच्या विभाजनाबाबत विचारलं असता शिंदे यांनी भाजपच्या मनात नेमकं काय आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं. मात्र, अशा प्रकारचं विभाजन झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत मांडलेल्या विचारांना धोका पोहोचू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. संविधानाच्या मूळ विचारांच्या विरोधात कामकाज होत असेल, तर ते देशासाठी धोकादायक असल्याचंही शिंदे म्हणाले. काँग्रेसमधील तरुण नेत्यांच्या भूमिकेबाबत विचारलं असता, प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, असं उत्तर देत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
