Sushma Andhare on Shalini Thackeray : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंचा नातू किआन याचाही उल्लेख केला. त्यामुळे मनसैनिक आक्रमक झालेत. अंधारे बाई, यापुढे याद राखा. संबंध नसतांना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणात ओढलं, तर तुमच्या कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही, असं ट्वीट करत शालिनी ठाकरेंनी (Shalini Thackeray) इशारा दिला. त्याला आता सुषमा अंधारेंनी प्रत्त्युत्तर दिलं.
शालिनी ठाकरेंचं वक्तव्य चीप पब्लिसिटीचा प्रकारा आहे. त्यावर मला बोलायचं नाही. पण जर त्यांना फार इच्छा आणि हौस असेल तर त्यांनी दिवस, वेळ आणि ठिकाण ठरवावं. माझी तिथं निशस्त्र जायची तयारी आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं.
शालिनी ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘या बाई नेमक्या कोण आहेत? हे मला माहीत नाही. तु्म्हाला माहित असेल तर सांगा. मी अशा बिनमहत्त्वाच्या लोकांबद्दल अजिबात बोलत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगते, डीजे असो की लेझर असो, आम्ही दहा वर्षांपासून त्याविरोधात लिहितो आहोत, बोलत आहोत. त्यामुळे तो आता मुद्दाच नाही. उगीच कोणताही कशाला संबंध जोडायचा आणि आम्हाला तुम्ही बोललात म्हणायचं. उगीचच काहीतरी अर्थ जोडण्यात काही अर्थ नाही. नांदेड, संभाजीनगरमध्ये जे मृत्यूचं तांडव सुरू आहे, त्यावर आम्ही प्रश्न विचारत आहोत, हाच आमचा मुद्दा आहे.
यावरून लक्ष वळवण्यासाठी जाणीवपूर्वक हे उपकंत्राटदार नेहमीच लुडबूड करतात. आता तुम्ही ज्यांचं नाव (शालिनी ठाकरे) घेतलं, तो चीप पब्लिसीटाचा प्रकार आहे. त्यावर मला बोलायचं नाही. पण ज्यांनी जाळ, गुरगुरले, भडकले, डरकाळई असे शब्द वापरले. मला खरंच अशा भानगडीत पडायची इच्छा नाही. तरीही त्यांची फारच इच्छा आणि हौस असेल तर दिवस, वेळ आणि ठिकाण ठरवा. माझी तिथं निशस्त्र जायची तयारी आहे, असं अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक निघाली. त्याचा आपल्या नातवाला त्रास झाला. म्हणून हा नेता भाष्य केरेल. नेत्यांच्या नातवांच आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र, गोरगरिबांचं काय? नुसतं दुपारी उठून कसं चालेलं, असं म्हणत अंधारेंनी टीका केली होती.