Download App

‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, माफी मागणार नाही’; हक्कभंग प्रकरणी अंधारेंचे थेट गोऱ्हेंना पत्र

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare) विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे. अंधारे यांनी आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त केली नाही तर हक्कभंग मांडण्यास परवानगी देण्यात येईल, असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले होते. त्यानंतर अंधारे यांनी पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी माफी आजिबात मागणार नाही. यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, असे सुषमा अंधारेंनी या पत्रात म्हटलं आहे. महापुरुषांच्या अपमानावर जे लोक चकार शब्द काढत नाहीत. निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मी माफी आजिबात मागणार नाही.

उपसभापती नीलम गोऱ्हे आमदार रवींद्र धंगेकर यांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. पण, धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत असा मुद्दा उपस्थित करत अंधारेंवर हक्कभंग आणावा अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. तसेच भाजप आमदार देवयानी फरांदे यांनीही अंधारेंवर हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. या घडामोडींनंतर सुषमा अंधारेंनी आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त करणारं पत्र द्यावं, असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. त्यानंतर अंधारेंनी पत्र लिहित माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले.

आरोप करणं सुषमा अंधारेंच्या अंगलट; भाजप आमदाराकडून विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे. इथून पुढेही केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे. विधिमंडळाच्या सभापती पदावरील व्यक्तीने माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका माझ्यावर ठेवला आहे.

माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्य विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहूतपणे नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरविण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे, असे अंधारे यांनी या पत्रात म्हटले आहे.

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; सुषमा अंधारे यांना नाशिकमधून निनावी पत्र..

Tags

follow us