बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू झाले आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.
त्यानंतर आता महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावला जाण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी रोखल्यानंतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. तरी देखील कर्नाटक सरकारनं पुन्हा आपला रंग दाखवला आहे. तर आता मात्र हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिलीय.