Download App

पी.एन. गेले… वारसा राहुल पाटलांकडे : चंद्रदीप नरकेंना ‘करवीर’ अजूनही हाताबाहेर?

करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर म्हंटलं की पक्षापेक्षा गटा-तटाचं राजकारण हे आपसूकचं आलंच. पी.एन गट, बंटी पाटील गट, महाडिक गट, मुश्रीफ गट, घाटगे गट, कोरे गट, माने गट, नरके गट असे एक ना अनेक गट या जिल्हात सक्रिय आहेत. थोडक्यात काय तर जेवढे नेते, तेवढे गट ही कोल्हापूराच्या राजकारणाची प्रमुख ओळख. पक्ष कोणताही असो, कुठेही असो इथे नेत्यांची आणि गटांची भूमिका महत्वपूर्ण ठरते. असाच गटांचा म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे करवीर. एकूण तीन तालुक्यांत विभागाला गेलेला हा जिल्ह्यातील मोठा मतदारसंघ आहे. याच करवीरमध्ये (Karveer Assembly Constituency) सध्या विधानसभा निवडणुकीचे कसे वारे वाहत आहे? कोण कोण इच्छुक आहेत, कोण बाजी मारु शकते याचा लेट्सअप मराठीने घेतलेला ‘ग्राऊंड झिरो’ आढावा… (there will be a fight between Rahul Patil and Chandradeep Narke in Karveer assembly constituency.)

करवीर विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यांतील 275 गावांचा समावेश होतो. यात करवीरमधील 102, पन्हाळा तालुक्यातील 68 आणि गगनबावडा तालुक्यातील 44 गावांचा समावेश आहे. इथले काँग्रेसचे विद्यमान आमदार पी. एन. पाटील (P.N. Patil) यांचे लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) निकालापूर्वीच निधन झाले. त्यानंतर इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पी.एन. यांचे पुत्र राहुल पाटील (Rahul Patil) यांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे तेच इथले उमेदवार असतील हे निश्चित आहे. त्यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शेकापचे संपतराव पवार, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील असे नेते महाविकास आघाडीकडे आहेत.

नारायण राणेंचा स्वबळाचा नारा; दादा अन् शिंदे सेनेला एकही जागा मिळणार नाही?

पण या मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची ताकदही मोठी आहे. त्यामध्ये महाडिक गट, जनसुराज्यचे आमदार विनय कोरे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, पी. जी. शिंदे यांचा समावेश आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचाही गट आहे. करवीर विधानसभा मतदारसंघावर पूर्वी शेकापचे वर्चस्व होते. नंतर या मतदारसंघावर काँग्रेसने आपला झेंडा लावला. पी. एन. पाटील यांनी शेकापकडून मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यानंतर काँग्रेसच्या पी. एन. पाटील आणि शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्यात सामना रंगू लागला. यात पाटील यांना दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु 2019 च्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांचा पाटील यांनी पराभव केला. त्यावेळी नरके यांना फारशी कोणाची साथही मिळाली नव्हती.

आता या मतदारसंघात पुन्हा एकदा विधानसभेची हवा वाहू लागली आहे. लोकसभेला शाहू महाराज छत्रपती यांना मिळालेली भक्कम आघाडी आणि पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर तयार झालेली सहानुभूती ही राहुल पाटील यांच्यासाठी जमेची बाजू आहे. सतेज पाटील यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवातच या मतदारसंघातून केली असल्याने त्यांचाही या तालुक्यात गट आहे. करवीरप्रमाणेच सतेज पाटलांचा गगनबावडा तालुक्यातही प्रभाव आहे. या तालुक्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी चांगले जाळे निर्माण केले आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार जयंत आसगावकर हेही या मतदारसंघातीलच आहेत.

काँग्रेसचा चाणाक्य महाराष्ट्राच्या मैदानात… विधानसभेला महायुतीची धडधड वाढणार?

तर कुंभी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणारी गावे ही नरके यांच्या जमेची बाजू आहे. महाडिक गटाच्या सोबत येण्याने नरके यांचे बळ वाढले आहे. आमदार विनय कोरे यांचा पन्हाळा तालुक्यात प्रभाव आहे. या तालुक्यातील 68 गावे करवीरमध्ये आहेत. गगनबावड्यातील काही गावांमध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांचा प्रभाव आहे. यावरून या मतदारसंघात सर्व नेत्यांची आपापल्या भागात ताकद दिसून येते. असे असले तरी लोकसभेची गणिते, काँग्रेसची वाढलेली ताकद, पी. एन. पाटील यांच्यासाठीची सहानुभूती, महाविकास आघाडीतील नेते या सगळ्यामुळे महायुतीला विधानसभेला प्रचंड कष्ट घ्यावे लागणर यात शंकाच नाही

follow us