बुलढाणा : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगतच असते. यातच शिंदे गटाच्या एका नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचाच हक्क आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे.

जाणून घेऊ नेमकं काय म्हणाले गायकवाड?
बाळासाहेब ठाकरे काही कोणाची खासगी मालमत्ता नाही. ते विश्ववंदनीय महापुरुष आहेत. देशाचा महापुरुष हा कोण्या एकट्याचा नसतो. त्यामुळे कोणी कितीही ओरडले तरी कायदेशीरदृष्या कोणी काहीच करू शकत नाही. आपण आपल्या वडिलांसाठी काय केलं? आणि आमच्यासारख्या लोकांनी किती रक्त सांडलं हे पहावं.
मावळेसोबत होते म्हणून बाळासाहेबांचे विचार देशभर पोहोचले. बाळासाहेब हे महापुरुष आहेत. त्यामुळे महापुरुष म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचा हक्क आहे. असा शाब्दिक हल्लाबोल आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
दरम्यान बंडखोरीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद हा नेहमीच झळा आहे. यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून शिंदे गट आणि ठाकरे गट कायमच आमने-सामने येत असल्याचं पहायला मिळत आहे. आता या वादात शिंदे गटाचेआमदार संजय गायकवाड यांनी उडी घेतली आहे. आता संजय गायकवाड यांच्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
