अहमदनगरः काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद आता उफाळून आला आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांच्या राजीनाम्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर काहींनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अनेकांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोरात म्हणजेच काँग्रेस असं नगर जिल्ह्यातील समीकरण आहे. त्यामुळे थोरात यांचे राजकीय वाटचालीवर अनेकांची भवितव्य अवलंबून आहे.
तांबे हे नाशिक पदवीधर निवडणूक अपक्ष लढण्याच्या वेळेस अनेक स्थानिक काँग्रेस नेते, कार्यकर्ते हे त्यांच्याबरोबर गेले होते. आता थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख म्हणाले, थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीमाना दिल्याचे माध्यमांतून कळते आहे. थोरातांचा राजीनामा आमच्यासाठी अनपेक्षित आहे. आमचे पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील. महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकत्रित बसून, यावर तोडगा काढतील. १५ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठक होईल. अंतर्गद मतभेद मिटतील, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे.
श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. कानडे म्हणाले, थोरात यांनी राजीनामा दिल्याबाबत अधिकृत काहीच माहिती नाही. त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, माध्यमांतून थोरात यांनी राजीमाना दिल्याचे कळते आहे. थोरात हे पक्षातील मोठे नेते आहे. स्थानिक पातळीवर मात्र आम्हाला काहीही माहिती मिळालेली नाही.
थोरात म्हणजेच काँग्रेस असं नगर जिल्ह्यातील समीकरण आहे. त्यामुळे थोरात यांचे राजकीय वाटचालीवर अनेकांची भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे अनेकांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोरात यांनी एखाद्या संघर्षात पहिल्यांदाच अशी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये राहणार की जाणार यावर आता नगर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.