Download App

Shinde VS Thackery : ‘वज्रमूठ’ सभेपुर्वी शिवसेनेचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ‘या’ खासदाराचे निकटवर्तीय शिवसेनेत

UBTs Maruti Salunke entered in Shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेले माहीतगार मारुती साळुंखे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केले.

मारुती साळुंखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. गटातील आणि संघटनेची घडी कशी बसवावी तसेच प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळात कशी पोहचवावी याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर होती.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध उठाव करून एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतरही संघटनेची नव्याने बांधणी करण्यात मारुती साळुंखे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी करून घेतलेली भूमिका त्यांना पटेनाशी झाली होती. तसेच बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचे असेल तर एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही हे पटल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

पवारांनी झटका दाखवलाच; पिचडांच्या सत्तेला जोरदार सुरूंग

साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोबत मिळून संघटना अधिक जोमाने वाढवू असेही निक्षून सांगितले.

मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून संघटनेची अचूक बांधणी करणारा एक मोहरा शिंदे यांना मिळल्याने पक्षवाढीसाठी त्याचा त्यांना मोठा उपयोग होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे हे देखील उपस्थित होते.

Tags

follow us