Uddhav Thackeray addicted to power, : सत्तेची नशा कधी, कशी व कुणाला लागली हे उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या व्यसनापायी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाच्या पाठीत खंजिर खुपसून २०१९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली.
आज बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर जनकल्याणाचे व अंत्योदयाचे साधन आहे, असे सांगून ते म्हणाले, तिन्ही पक्षाचा विचार महाराष्ट्राचा सत्यानाश करायाचा आहे. मविआच्या सभामंध्ये एक नेता बोलताना इतर तीन लोक वेगळेच बोलतात, अर्धी गर्दी कार्यक्रम सोडून निघून जाते. काल नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना ५० टक्के लोक निघून गेले होते. तीन पक्ष आप-आपले लोक आणतात गर्दी जमवितात, गाड्या-घोड्या लावतात, लोक येतात, एन्जॉय करतात आणि निघून जातात. जनतेला विकास हवा आहे. तोंडाच्या वाफा नाहीत, अशा शब्दात ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे फडतूस असा पुनरुच्चार केला. यावर बावनकुळे म्हणाले की, कुटुंब प्रमुख जेव्हा फडतूस असतो, तेंव्हा घराचे वासे फिरतात. म्हणूनच 40 जिगरी सहकारी ठाकरेंना सोडून गेले. त्यावरून फडतूस कोण हे आपोआप सिद्ध होते. वारंवार स्वतः बद्दल ते बोलत आहेत. नागपूरच्या सभेत भाषण सुरु असताना खुर्च्या रिकाम्या होत्या. यातून त्यांचाच फडतूसपणा सिद्ध होतो.
महाराष्ट्र भूषण दुर्घटनेत 13 वा मृत्यू; उदय सामंत म्हणाले, ‘कोणीही राजकारण करु नये’
काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार लवकरच बाद होणार असून ते बाद झाल्यावर अजित पवार यांच्यासोबत भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अजित पवार हे भाजपात येणार अशी चर्चा आहे. अजित पवार भाजपात जाणार की, नाही, याविषयी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या पक्ष प्रवेशाविषयी पत्रकारांनी बावनकुळेंना विचारलं की, अजित पवार येणार असं बोलल्या जातं आहे. त्याचं भाजपात स्वागत कराल का, भाजपच्या काही हालचाली सुरू आहेत का? पत्रकारांच्या या प्रश्नांवर बोलतांना बावनकुळे म्हणाले की, याबाबत काहीच माहित नाही, त्यांच्या भूमिकेवर काहीच माहिती नाही. चर्चा खूप होत असतात, जर-तरला राजकीय जीवनात अर्थ नाही, त्यामुळे ज्या गोष्टीची चर्चा नाही. आमचा हा महिना प्रवेशाचा आहे. 25 लक्ष प्रवेश करुन घेणे हेच आमचे लक्ष्य आहे. बुथवर काम करणाऱ्यांचा प्रवेश सुरु आहे. पक्षामध्ये कोणीही आले तरी स्वागतच आहे. त्यांना भाजपची विचारधारा मान्य असेल, त्यांना भाजपच्या विचारधारेनुसार काम काम करायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, असं बावनकुळे म्हणाले.
काल आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात आलेल्या 11 जणांचा उष्माघाताने बळी घेतला. यावरून राज्य सरकारव विरोधकांनी जोरदार टीका केली. सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळं लोकांचे बळी गेले, अशी टीका विरोधक करत आहेत. यावर बोलतांना बावनकुळे म्हणाले की, कार्यक्रमावर विरोधकांना राजकारण करायचे आहे, कार्यक्रमात प्रकृती बिघडून मृत्यू झाला ही घटना दु:खद आहे. कुणामुळे काय झाले याला कोणताच अर्थ नाही. मृताना काय मदत करता येईल हे महत्वाचे आहे, असे सांगून त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या कालच्या भाषणात बावनकुळेंवर मतिमंद प्रदेशाध्यक्ष अशी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देतांना बावनकुळे म्हणाले की, एका आमदाराने अशी टीका करणे योग्य नाही. त्यांचा बोलविता धनी कोण हे सर्वांना माहीत आहे. पुढच्या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातील जागरूक नागरिक या आमदारांचा योग्य उपचार करणार आहेत, असं बावनकुळे म्हणाले.