Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री होते. तिन्ही पक्षांच्या आघाडीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आलं होतं. आता याच मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. मी फोटोग्राफी करायचो, व्यंगचित्र काढत होतो पण, मुख्यमंत्री होईन असं कधीच वाटलं नव्हतं. मी मुख्यमंत्री होण्यास शरद पवार (Sharad Pawar) जबाबदार आहेत, असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री असताना मी जमेल ते काम केलं आणि राज्यातील जनतेनंही मला स्वीकारलं. मला राज्याच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मान मिळाला हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई आहे.
Uddhav Thackeray : आधी ‘पेगासस’, आता ‘अॅपल’ फोन हॅकिंग वादात ठाकरे गटाची उडी
माझी आजी ही अमरावतीतील परतवाड्याची आहे. मी उगाच फेकाफेकी करणार नाही. जे नातं आहे ते आहे, नाही ते नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही निशाणा साधला. आता सर्व ठिकाणी अंधार पसरला आहे. कुणीच काही बोलत नाही. पण वणवा पेटला तर काय होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. चौथ्या स्तंभाला वाळवी लागली आहे. ईडीचा कारभार सुरू आहे. पहिलं आपण हिडीस वागणं म्हणायचो पण आता ईडीस कारभार सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
30 वर्षे युतीत तरीही शिवसेना भाजपा झाली नाही
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेने आघाडी केल्याच्या मुद्द्यावरही ठाकरे यांनी पुन्हा भाष्य केले. ते म्हणाले, काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेची काँग्रेस झाली अशी टीका आमच्यावर केली जाते. पण, आम्ही मागील 30 वर्ष भाजपबरोबर होतो तेव्हा शिवसेनेची भाजपा झाली नाही मग आता काय होईल. आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही. भाजप आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य केल्याने त्यांच्या मुख्यमंत्री होण्यामागे नेमकं कोण होतं हे आता स्पष्ट झालं आहे. तसेही महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार शरद पवारच चालवत होते असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात होता. त्यांच्या या वक्तव्यात तथ्य होते असेच उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Uddhav Thackeray : ‘पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं? ठाकरे गटाचा थेट सवाल