Uddhav Thackeray : ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा सामनातून सडकून टीका केली आहे. मोदी सरकारकजडून ज्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या गोष्टी केल्या जात आहेत त्यावरच ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. एका अहवालाचा आधार घेत मोदी सरकार करत असलेल्या कथित पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या फुग्याला टाचणी लागल्याचीही टीका केली आहे.
औद्योगिक क्षेत्र काय आणि कृषी क्षेत्र काय दोन्ही बाबतीतील मोदी सरकारचे प्रगतीचे दावे फोलच आहेत. फ्रंटलाइन वर्कफोर्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म बेटरप्लेस च्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. रोजगार निर्मितीत तर दोन दशलक्ष एवढी घट झालीच आहे. शिवाय नोकरदारांचे पगारही घटले आहेत. मोदी सरकारच्या तथाकथित पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या (Indian Economy) फुग्याला टाचणी लावणारा हा अहवाल आहे. रोजगार आणि आर्थिक महासत्तेची मोदी सरकारची स्वप्ने या अहवालाने फोल ठरवली आहेत. देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नकोत तर त्यांच्या हाताला काम हवे आहे ते आधी द्या आणि नंतर तुम्हाला काय 2047 ची पतंगबाजी करायची ती करत बसा, अशी टीका या लेखात केली आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाचा चौफेर विकास होत असून कोरोना महामारीच्या तडाख्यानंतरसुद्धा रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला गती मिळाली आहे असे ढोल सत्तापक्ष पिटत असत. खुद्द पंतप्रधान मोदी देखील पाच ट्रिलियन इकॉनॉमीपासून 2047 पर्यंत हिंदुस्थानची गणना विकसित देशांत होणारच अशी स्वप्न दाखवत असतात. मात्र, या स्वप्नांना एका अहवालाने आता जमिनीवर आणलं आहे, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाने केली आहे.
रोजगार आणि उत्पन्न दोन्ही कमी असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेतील चलनवलनावर होत आहे. उलाढाल कमी म्हणजे अर्थव्यवस्थेला ब्रेक असाच नियम असला तरी सरकार मात्र देशाची वाटचाल पाच ट्रिलियमन इकॉनॉमीकडे कशी सुरू आहे याचेच ढोल बडवण्यात मग्न आहेत. पुन्हा मोदी सरकार ज्या मेक इन इंडिया, स्टार्टअप धोरणाचा गवगवा करत असते त्याची धूळही हळूहळू खाली बसत आहे. विशेषतः कृषी क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणुकीचा ओघ घटला असून ही अधिक काळजीची गोष्ट आहे. सन 2021-22 च्या तुलनेत या वर्षी ही गुंतवणूक तब्बल 45 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.
‘महिला आरक्षण अनेकदा आणलं, पण यशस्वी झालं नाही’: प्रफुल्ल पटेलांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका…