आपल्याला जी संधी मिळते, त्या संधीचा उपयोग हा काहीतरी देण्यासाठी करायला हवा. कारण, पदं येतात, पदं जातात. सत्ता येते, सत्ता जाते. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण माझ्यातर आता मनातही नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लगावला. जवाहरलाल दर्डा (Jawaharlal Darda) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav Thackeray On eknath shinde ajit pawar they said Surat Guwahati traveling is not a struggle)
ठाकरे म्हणाले, दिवस येतो, जातो. सत्ता येते, जाते. आज १०० वर्ष होतांना आज आपण बाबुजींची आठवण करायला एवढे सगळे जमलो. म्हणजे, नक्कीच त्यांनी काहीतरी आपल्याला चांगलं दिलं. आपण हाच विचार केला पाहिजे की, आपल्याला जी संधी मिळते, त्या संधीचा आपण देण्यासाठी काय उपयोग केला, याचा विचार केला पाहिजे. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी आता याचा विचारही करत नाही. ही पद येतात, जातात, पण माणूस म्हणून आपली एक ओळख असते, ती ओळख फार महत्वाची असते. आणि त्या ओळखीचा उपयोग आपण आपल्याला मिळालेल्या पदाच्या वेळी कसा करतो, हा महत्वाचा भाग आहे, असं ते म्हणाले.
PM केअर फंडातील पैशाचं काय झालं? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला थेट सवाल
मला सद्गुरु वामनराव पै यांचे शब्द आठवतात, की, तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण हल्ली ज्यांनी घडवलं, तो शिल्पकारचं पळवण्यचा प्रयत्न सुरू आहे. स्वत: शिल्पकार होऊ शकत नाही. पण ज्यांनी घडवलं, तोच पळवून नेल्या जात आहे. बाबजींची संघर्षयात्री ही पुस्तिका मी बघत होता. तेव्हा वाटलं, यात्री अनेक असतात. टूर्स आणि ट्रॅव्हस पण खूप असतात. सुरत- गुवाहटी वैगैरे खूप ट्रॅव्हलिंग होतं. पण, यात्र्यांमध्ये संघर्ष यात्रा हा शब्द आपण विसरायला लागलो, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला.
यावेळी बोलतांनी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लढा दिला आहे. कष्ट घेतले. त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अन् आपण आनंदाने जगू शकतो. पण, ज्या विचारसरणीचं स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध संबंध नाही. काहीच कर्तृत्व नाही, ती विचारसरणी आता आता देशावर राज्य करत आहे आणि त्यांना देश कह्यात घ्यायचा आहे, असं ठाकरे म्हणाले.
बरेचजण आणीबाणीच्या स्थितीबद्दल बोलतात. त्यावेळी ज्या लोकांवर अत्याचार झाले ते अत्याचाच चुकीचेच होते. पण, त्यानंतर ज्यांनी आणीबाणी लादली होती, त्यांनाी आपच्या विरोधात प्रचारासाठी वेळ दिला होता. लोकांना आंदोलन करू दिलं, ही सुध्दा लोकशाही आहे. पण, आता तर बोलायला लागल्यावर विरोधकांची तोंडंच बंद केली जातात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.