Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय दिला आहे. तो अत्यंत अयोग्य आहे. निवडणूक आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची तिथे नेमणूक करण्यात आली आहे. घटनेच्या क्रमाने निकाल देणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगच बरखास्त करावा. निवडणूक प्रक्रियेनुसार तिथेही निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. हा सरळसरळ आमच्यावर अन्याय आहे. हा निकाल मानायला मी आजिबात तयार नाही. तेव्हा या निर्णयाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झाली पाहिजे. कारण, आता आमचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप (BJP), निवडणूक आयोग आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केले. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरले, हा पूर्वनियोजित असा कटच आहे. जे धनुष्य रावणाला पेलले नाही. ते या मिंध्यांना काय पेलणार ? असा सवाल त्यांनी केला. त्यांना पेलणे शक्य नाही. त्यामागे शिवसेना संपविण्याचा हा दिल्लीश्वरांचा डाव आहे. तो काही सहज साध्य होणार नाही. महत्वाचे म्हणजे, आयोगाला चिन्ह व नाव देण्याचा असा निर्णय घेता येत नाही. मात्र, त्यांनी तसा निर्णय घेतला त्यामुळे आम्ही न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले, महाविकास आघाडी..
आयागोला लोकप्रतिनिधींचा निकष लावायचा होता, तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली. आमच्याकडून स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रं का घेतली. शिवसेनेच्या कार्यकारिणी सभेचा तपशील दिला नाही, असे आयोगाकडून सांगण्यात आले. पण आम्ही तर सीडीसुद्धा दिली होती. त्यावर आयोगाचं म्हणणं असं आहे की, कव्हरिंग लेटरमध्ये काही लिहिलेले नाही, असे ठाकरे म्हणाले.
त्यासंदर्भात ॲड. कपिल सिब्बल यांनी सांगितले की, तुमच्याकडे जे विषय येतात, त्याचं गांभीर्य तुम्हाला कळत नाही का. तुम्ही फक्त कव्हरिंग लेटर वाचून निकाल देता का. त्या पाकिटात काय आहे, ते बघता की नाही, अशी विचारणा त्यांनी आयोगाला केली आहे. त्यामुळे हा सर्व भोंगळ कारभार पाहता विद्यमान निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.
पक्षनिधीच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले, की आयोगाला तिथे दरोडा घालता येणार नाही. जर तसा प्रयत्न त्यांनी केला तर त्याविरोधातही न्यायालयात जाऊ. आता 16 जण गेले त्यानंतर 23 अपात्र केल्याची नोटीस दिली आहे. दोन तृतीयांश एका पक्षात विलीन व्हायला हवेत मात्र तसं झालेलं नाही. मधल्या काळात एक वादग्रस्त आयुक्त नेमले गेले आणि घाईघाईत त्यांची नियुक्ती कशी काय झाली याचं उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. गुंता वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच आम्हाला अपेक्षा आहेत त्यासाठी न्यायालयाला आम्ही आवाहन केल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.
मला शरद पवार, ममता बॅनर्जींचा (Mamta Banarjee) फोन आला. नितीश कुमारांचा (Nitish Kumar) देखील फोन आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दूरध्वनीवर संवाद साधून, शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली. आता हे प्रकरण देशभरात पेटणार आहे. अशा पद्धतीने पक्ष संपविण्याचा प्रयत्न होत आहे की काय अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
आता पुन्हा संवाद
यानंतर आता राज्यभरात पुन्हा संवादाचा उपक्रम सुरू केला जाणार आहे. आधी आमची पथके गावागावात जाणार आहेत. तेथे लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मी स्वतः सभा घेणार आहे, अशा पद्धतीने नियोजन केल्याचे ठाकरे म्हणाले.
माझे वडील त्यांनी चोरले
मध्यंतरी कुणीतरी म्हणाले, की अमित शहा त्यांना वडिलांसारखे वाटतात. पण त्यांनी माझे वडील आधीच चोरले आहेत. ठाकरे नाव काढा, स्वतःच्या वडिलांचे नाव लावा आणि लोकांसमोर या मग तुम्हाला समजेल असे आव्हान ठाकरे यांनी शिंदे यांचे नाव न घेता दिले.
त्याचे दुःख जास्त
शिवसेना ही आमची आई आहे असे म्हणवणारे आहेत त्यांनीच हत्या केली. आणि हत्या करणारेही घरातलेच आहेत. त्यांना सुपारी दिली गेली होती. याचे दुःख जास्त आहे, असे ठाकरे म्हणाले.