Vijay Wadettiwar Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्रि आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) गेले होते. या दौऱ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या दौऱ्याला फालतूगिरी म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. रामभक्त तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं. मुख्यमंत्री शिंदे हे प्रभू रामाच्या नावे मतं मागायला अयोध्येत गेले, मात्र, जनता त्यांनी शरयू नदीत डुबवेल, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.
भंडाऱ्यात विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री विरोधकांना जागा दाखवण्यासाठी शरयू नदीच्या काठावर गेले. आम्ही, राम के नाम वोट मागणारे नाहीत. श्रीराम आमच्या हृदयात आहेत. हृदयातून रामाची पूजा करतो, आणि हे मतांसाठी रामाची आरती करतात. हा दोघातला फरक आहे. त्यामुळं स्वार्थी कोण आहे, दिसतं. आरतीसाठी जे शरयू नदीच्या काठावर आहेत, जनता त्यांना नदीत ढकलल्याशिवाय राहणार नाहीत. रामाच्या नावाचा बाजार मांडल्या जात आहे. त्यांच्या नावाचा दुरूपयोग होत आहे. रामाला पूजायंच सोडून, मतासाठी वापर केला जात असल्याचा घणाघात वडेट्टीवर यांनी केला.
ते म्हणाले, की जनतेला किती वेळ बनवाल. एकवेळा-दोनवेळा.. मात्र, ही जनता वारंवार या लोकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. राम राम म्हणून महात्मा गांधींनी प्राण त्यागला. रामरामाने माणसे जोडली जातात. राम राम केलं की माणसाचे दिवस चांगले जात आहे. मात्र, श्रीरामाचा नवीन नारा लावून माणसे तोडण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या मुखात राम मतासाठी आणि आमच्या मुखातील राम प्रजननासाठी असल्याचे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांना दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असून त्यांचा अपमान सहन करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले होते. यावरही वडेट्टीवर यांनी भाष्य केलं. सावरकर हे शिंदेचं दैवत आहे. महाराष्ट्राचे दैवत आहेत की नाही, हे माहित नाही. महाराष्ट्राचे दैवत हे मा जगदंबा, साईबाबा, संतश्रेष्ठ गजानन महाराज आहेत. महाराष्ट्राचे दैवत हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्राचे दैवत बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे दैवत महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. यांचा अपमान झाला तर महाराष्ट्राचा अपमान होतो आहे. त्यांच्या लेखी कुणाचा अपमान झाला तर त्यांनाच माहित, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
आशिष देशमुख यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असून त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आशिष देशमुख यांच्यावर हायकमांडने शिस्तभंगाची कारवाई केली. त्यावर बोलतांना वडेट्टीवर म्हणाले की, देशमुखांना शिस्तभंग समितीसमोर उत्तर मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यांनी आपली बाजू मांडली नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली असावी. मी ओबीसीसाठी महाराष्ट्रभर काम करतो, आशिष देशमुखांचा ओबीसीसाठी मला आवाज दिसला नाही. राहुल गांधींनी ओबीसींचा अपमान केला इतकाच त्यांचा आवाज दिसला. निरव मोदी, ललित मोदी यांनी देश लुटला. आणि पळून गेले. त्यांना चोर म्हणणं हा ओबीसींचा अपमान होतो का… त्यांना पायघड्या घालू का…. की, या आणि देश लटून घ्या… यांचा अपमान म्हणजे, ओबीसींचा अपमान होतो का… असा सवाल करत आशिष देशमुख हे कुणाची तरी सुपारी घेऊन असले वक्तव्य करत आहेत, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी यांच्यावर हल्लाबोल केला.