Vishwajeet Kadam : राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून मोठे राजकीय भूकंप होताना पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar)बंडानंतर आज पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यांच्याबरोबर कॉंग्रेसचे (Congress)दिवंगत नेते पतंगराव कदम (Patangrao Kadam)यांचे चिरंजीव आमदार विश्वजीत कदम हे देखील भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता विश्वजीत कदम यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आमदार विश्वजीत कदम यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे, मात्र यापुढे कॉंग्रेसमध्ये राहण्यावर देखील स्पष्टपणे सांगितले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष राहणार आहे.
आमदार विश्वजीत कदम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, आज (दि.12) सकाळपासून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याच्या वेदना आपल्याला होत आहेत.
Sonakshi Sinha : दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा क्लासी लूक, चाहते घायाळ
या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांकडून चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे. मी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यावेळी त्यांनी प्रथमतः आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं.
आपण आजही कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेनं स्व.पतंगराव कदमसाहेबांना भरभरुन प्रेम दिलं. त्याच पलूस कडेगावच्या माता भगिनींनी, ज्येष्ठांनी, तरुण कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातूम सांगली जिल्ह्याची, महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली.
त्यामुळे माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये पलूस कडेगावच्या नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय घेणार नसल्याचे यावेळी आमदार विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना चव्हाण यांचा राजीनामा मोठी उलथापालत घडवून आणणारा दिसून येत आहे. चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील आणखी काही आमदार बाहेर पडणार असल्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्याचबरोबर आमदार विश्वजीत कदम यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आमदार कदम यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.