Ambadas Danve Video : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आधीच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आणि मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) प्रकरणात बॅकफूटवर असलेल्या महायुती सरकारवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आज सभागृहात बोलताना त्यांनी दावा केला की, जलसंपदा विभागात सर्व निर्णय भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) घेत आहे. दानवे यांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सभागृहात बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या दृष्टीने जलसंपदा विभाग अतिशय महत्वाचा भाग आहे. मात्र आज जलसंपदा विभागाचे निर्णय मोहित कंबोज घेत आहे. या विभागात दीपक कपूर नावाचे अधिकारी आहे. हे अधिकारी मोहित कंबोज यांना सांगितल्या शिवाय पाणी देखील पीत नाही. मात्र याबाबत मंत्र्यांना माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही, पण जलसंपदा विभागात मोहित कंबोज यांना सांगितल्या शिवाय पान देखील हालत नाही. असा दावा सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, कोण आहे मोहित कंबोज जो या विभागाचे सर्व निर्णय घेत आहे. याबाबत माझ्याकडे पुरावा आहे आणि सभापतींकडे पुरावे सादर करणार आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी अंबादास दानवे यांनी केली.
‘एससीईआरटी’ चा मोठा निर्णय, राज्यात पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी पण शिक्षक संघटनांचा विरोध
तसेच या विभागात दीपक कपूर आणि मोहित कंबोज चर्चा करून या विभागात निर्णय घेतात असा दावा देखील अंबादास दानवे यांनी सभागृहात बोलताना केला. अंबादास दानवे यांच्या या आरोपानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.