मुंबई : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर (2019 Assembly Elections) भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील युती तुटली होती. त्यावेळी ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रावादी कॉंग्रेस सोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भाजपने ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिंदेंनी बंड केल्यानं शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले. या सगळ्या घडामोडींमुळे ठाकरे गट आणि भापज यांच्यात दरी निर्माण झाली आहे. हीच दरी कमी करण्याच्या दिशेने भाजपने सुरूवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाने भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र, आज धुळवडीच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. आम्ही विरोधकांना माफ केलं, आमच्या मित्राला कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती. त्यामुळे कोणी रडत होतं, कुणी गात होतं असं फडणवीस म्हणाले. फडणवीस आज मुंबईत धूलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान माध्यामांशी संवाद साधत असतांना बोलत होते.
ते म्हणाले, आमचे काही मित्र आहेत. मात्र, त्यांना कुणीतरी भांग पाजली होती. त्यानंतर कुणी गाणं गात होतं, कुणी रडत होतं. असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा, संगीताची नशा करावी, कामाची नशा करावी. आम्ही विधानसभेमध्ये सांगितलं होतं की, या सर्वाचा आम्ही जरूर बदला घेणार आहे. मात्र, आता आम्ही सर्व विरोधकांना क्षमा केलं. विरोधकांविषयी आम्हाला कटुता नाही. आम्ही त्यांना क्षमा केलं, हाच आमचा बदला आहे, फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आगामी काळात राज्यात महानगरपालिका आणि 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. शिंदे गटाला सोबत घेऊन निवडणूका लढण्यात भाजप रिस्क घेऊ शकत नाही. कारण, शिंदे गटाने ठाकरे गटासोबत जो व्यवहार केला, तो पाहता उद्धव ठाकरे सोबत मतदारांची सहानुभूती दिसते. शिवाय ठाकरे हे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे मतदार ठाकरे गटाला कौल देतील. आणि याचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे फडणवीस यांनी ठाकरे यांच्यासोबतची कटुता संपवण्याचे संकेत दिल्याचं बोलल्या जातं.
Ajit Pawar : ‘सावित्रीबाई-अहिल्याबाईंच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही हे लाजीरवाणं’
दरम्यान, मित्रांना कुणीतरी भांग पाजली होती. मात्र; आम्ही त्यांना माफ केलं, हे फडणवीस यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंना उद्देशून होतं, असं बोलल्या जातं. त्यामुळे फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.