Ajit Pawar : ‘सावित्रीबाई-अहिल्याबाईंच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही हे लाजीरवाणं’
अहमदनगर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Leader of Opposition Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अजित पवार हे आज पाथर्डी (Pathardi) येथे आले असता त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, फुले-शाहुंच्या महाराष्ट्रात, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांच्या महाराष्ट्रात आज मंत्रीमंडळामध्ये एकही महिला मंत्री नाही, हे लाजीरवाणं आहे. १३ कोटी लोकसंख्येच्या या राज्यात निम्म्या मतदार स्त्रिया असताना या मंत्रीमंडळात स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी एकही महिल मंत्री नाही. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना त्यांना स्थान का नाही? असा सवाल त्यांनी केला.
शिंदे-फडणवीस सरकारला विविध मुद्द्यांवरुन अजित पवार यांनी चांगलंच धारेवर धरलं. मंत्रिमंडळ विस्तारावरूनही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घणाघात केला. आज ८ महिने झाले तरी मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. आज फक्त मंत्रीमंडळात २० लोकांचा समावेश आहे. २२ मंत्रीपदे रिक्त आहेत. त्यामुळे विकासकामावर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्यांना आमदारांना त्यांनी चांगलचं डिवचलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाला देऊ असं सांगत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. कारण, सत्ताधारी पक्षाला मंत्रीमंडळ विस्तार केला तर सरकार कोसळण्याची भीती आहे. मंत्रीपद मिळेल अशी आशा असलेल्या आमदारांना मंत्रीमंडळात डच्चू मिळाला तर ते आमदार निघून जातील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
अर्थसंकल्प सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होणार पुर्ण
यावेळी बोलतांना पवारांनी महागाई आणि बेरोजगारीवरूनही सरकारवर टीका केली. ज्या पध्दतीने खतांच्या किमती वाढत आहेत, त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही. कांद्याला भाव नाही. त्यामुळे कांद्याची होळी करायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावं? शिवाय, गॅस सिलिंडर, पेट्रो, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. खाद्य पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत असं म्हणत, सरकारने थोडं लोकहिताच्या कामांकडे लक्ष द्यावं, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असा टोला लगावला. दरम्यान, ७५ हजार लोकांची भरती करणार असल्याचं शिंदे-फडणवीस सरकारने सांगितलं होतं. मात्र, अद्याप का नाही काढली भरती? असा सवाल त्यांनी केला. दिवसेंदिवस महागाई आणि बेरोजगारी वाढतेच आहे. मात्र, सरकारला महागाईशी-बेरोजगारीशी काही देणंघेण नाही. सत्ताधारी फक्त आपलं सरकार कसं टिकेल, याचाच विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.