राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते म्हणून ज्यांची ओळख आहे व पवार घराण्याचे पुढील भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते नाव म्हणजे रोहित पवार होय. रोहित पवार हे आपल्या स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे ओळखले जातात. एक विद्यार्थ्याने त्यांना तुम्ही 2024 साली मुख्यमंत्री झाल्यास काय कराल, असा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना त्यांनी थेट उत्तर दिले आहे.
मी पदाच्या अपेक्षेने राजकारणात आलो नसून मिळेल ती जबाबदारी पार पाडण्याच्या मी प्रयत्न करील, असे पवारांनी म्हटले आहे. यावेळी ते वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘समृद्ध महाराष्ट्राचा आवाज व्हा’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
याचबरोबर मला पहिल्या किंवा शेवटच्या कोणत्याही नंबरला पाठवलं. अथवा कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन केलं, तरी मी मला मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल, असे त्यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन या राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पाविषयी देखील भाष्य केले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाला अजूनही गुजरातमध्ये जमीन मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प आजही महाराष्ट्रात येऊ शकतो. फक्त त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.