Download App

Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?

लेट्सअप मराठीच्या 'ग्राऊंड झिरो' या विधानसभा निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहू कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवार यांच्याकडून कोण मैदानात असू शकते?

विधानसभा निवडणुकीत किमान 20 मतदारसंघांत तरुणांना संधी द्यायची असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या डोक्यात आहे. मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये याबद्दल चर्चा होत आहेत. या 20 मतदारसंघांमध्ये परळी, आंबेगाव, श्रीवर्धन अशा बड्या नेत्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. यातच कागल (Kagal Assembly Constituency) या मतदारसंघातही पवार यांच्या डोक्यात दोन तरुण चेहऱ्यांची नावे आहेत. अजित पवार यांच्यासह शपथ घेणाऱ्या ज्या आठ-नऊ मंत्र्यांचा पराभव करण्याची पवार यांची मनोमन इच्छा आहे त्यात कागलच्या हसन मुश्रीफ (Hasan Mushreef) यांचाही समावेश आहे. (Who will be candidate from Sharad Pawar  against Hasan Mushrif in Kagal?)

लेट्सअप मराठीच्या ‘ग्राऊंड झिरो’ या विधानसभा निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहू कागलमध्ये मुश्रीफांविरोधात शरद पवार यांच्याकडून कोण मैदानात असू शकते…

कागल हा पूर्वीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. आधी विक्रमसिंह घाटगे, मग सदाशिवराव मंडलिक हे नेतृत्व कागलमधून पुढे आले. 1995 पर्यंत कधी घाटगे तर कधी मंडलिक हेच इथले आमदार असायचे. इथले विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे या दोघांचेही शिष्य. मुश्रीफ यांनी आधी घाटगे यांचे नेतृत्व स्वीकारले. पण कारखान्याच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये मतभेद झाले. मग मुश्रीफ सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृ्त्वात राजकारण शिकले. 1998 साली मंडलिक लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी शिष्यालाच कागलच्या मैदानात उतरवले. त्यावेळी त्यांचा संजय घाटगे यांनी सात हजार मतांनी पराभव केला.

अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?

1999 मध्ये पुन्हा मुश्रीफ विरुद्ध घाटगे यांच्यात निवडणूक झाली. त्यात मुश्रीफांनी बाजी मारली . तेव्हापासून मुश्रीफच इथले आमदार आहेत. त्यांची सध्याची पाचवी टर्म आहे. यात मधल्या काळात मुश्रीफ आणि मंडलिक यांचेही संबंध ताणले गेले होते. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्याकडे द्यावे, असा सदाशिवराव मंडलिक यांचा आग्रह राष्ट्रवादीत बंडानंतर शरद पवार होता. मात्र, बाबासाहेब कुपेकर यांच्या सहकार्याने मुश्रीफ यांनी टी. आर. पाटील यांना अध्यक्षपदी निवडून आणले. त्यानंतर मंडलिक व मुश्रीफ यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. तेव्हा पवार यांनी मुश्रीफ यांची पाठराखण केली. मग मंडलिक यांनी अपक्ष म्हणून लोकसभा लढवून जिंकून दाखविले.

त्यानंतर सदाशिवराव मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्या पराभवाचे कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी पुत्र संजय मंडलिक यांनाही मैदानात उतरवले. पण मुश्रीफ तरले. तिथून मुश्रीफ यांनी कागलवर लक्ष केंद्रीत ठेवले. कागल पंचायत समिती, नगरपालिका अशा संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवल्या. स्वतःच्या ताकदीवर स्थापन केलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे हा खाजगी साखर कारखाना अल्पावधीत नावावर रूपाला आणला. मंत्री म्हणून काम करताना विविध योजना राबविणारे, रुग्ण सेवा करणारे आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ख्याती झाली. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनांबद्दल मुश्रीफ आजही अभिमानाने सांगतात. मतदारसंघातील कोणत्याही रुग्णाचे मोफत उपचार, मुंबईतील रुग्णालयांमध्ये मोठी ऑपरेशन्स फ्रीमध्ये करवून घेतात. कामगारांसाठीही विविध योजना सुरु करण्याचे श्रेय मुश्रीफ यांना जाते.

एका बाजूला या चांगल्या गोष्टी असतानाच ईडी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याने मुश्रीफांनी प्रतिमा झाकोळली गेली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, ईडीचा ससेमिरा यामुळे मुश्रीफ यांनी शरद पवारांविरोधात जाण्याचे धाडस केले असे म्हंटले जाते. आता विधानसभेला मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. या फिल्डिंगमध्ये शरद पवार यांच्या डोक्यात दोन प्रमुख नावे आहेत. यात पहिले नाव आहे ते भाजपचे नेते समरजित घाटगे आणि दुसरे नाव आहे गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांचे. यात घाटगे यांच्यासाठी शरद पवार जास्त आग्रही असल्याचे बोलले जाते.

गेल्या वेळी भाजपचे उमेदवारी मिळावी यासाठी समरजित घाटगे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. देवेंद्र फडणवीस यांना दोनवेळा कागलमध्ये आणून जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. फडणवीस यांनीही घाटगे यांना ताकद देत भाजपचे जिल्हाध्यक्षपद, म्हाडाचे अध्यक्षपद आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. पण जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने येथे संजय घाटगे यांना उमेदवारी मिळाली. त्यावर निराश न होता घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यात 88 हजार मते घेतली तर मुश्रीफ यांनी एक लाख 16 हजार मते मिळाली. त्यांनी घाटगेंवर 28,133 मतांनी विजय मिळवला.

Ground Zero : अनिल देशमुखांचे राजकारण संपवण्याचा डाव… मुलानेच उचलला विडा?

आता हेच समरजीत घाटगे यंदा शरद पवार यांच्याकडून उभे राहणार अशी चर्चा आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि समरजीत घाटगेंमध्ये सातत्याने बोलणी सुरु आहेत. स्वत: शरद पवार हेदेखील समरजीत घाटगे यांच्याशी बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, घाटगे यांनी अद्याप शरद पवार गटाचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, ते या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती आहे. घाटगे हे फडणवीसांचे निकटवर्तीय असले तरी कागलमधून त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणे अवघड दिसत आहे. त्यामुळे रिकाम्या हाती बसण्यापेक्षा शरद पवार यांचा पर्याय चालू शकतो, असा विचार ते करत असावेत.

पवार यांच्या डोक्यात दुसरे नाव आहे ते स्वाती कोरी यांचे. कागल आणि गडहिंग्लज तालुका मिळून कागल मतदारसंघ तयार झाला आहे. कोरी या याच गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यांनी गडहिंग्लज शहराचे नगराध्यक्षपदही भूषविले आहे. अलीकडेच त्यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली.

शरद पवार यांच्या डोक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) माजी आमदार संजय घागटे यांचे पुत्र अंबरिश घाटगे यांचे नाव होते. कागल पंचायत समिती सभापती, गोकुळ दूध संघ, जिल्हा परिषद सभापती अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. मात्र हसन मुश्रीफ-संजय घाटगे यांचीही मैत्री जगजाहीर आहे. याच मैत्रीचा प्रत्यय नुकताच आला. फ्रेंडशिप डे दिवशी घाटगे यांनी आपण लढणार नसून मुश्रीफ यांना पाठिंबा देणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.

आता मुश्रीफ यांच्यासोबत माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह संजय घाटगेही आले आहेत. त्यामुळे सध्या तरी समरजीत घाटगे यांच्याव्यतिरिक्त मुश्रीफ यांना विरोधक नाही. त्यामुळे समरजीत घाटगे हेच शरद पवार यांचे उमेदवार असू शकतात. पण समरजीत घाटगे पवारांचा प्रस्ताव स्वीकारणार का? ते निवडणुका लागल्यावरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटते? कागलच्या या गुंत्यामध्ये कोणाला यश मिळणार? हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा

follow us