अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?

अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?

जुलै 2023. राष्ट्रवादीत (NCP) बंड झालं. अजितदादांनी (Ajit Pawar) आठ आमदारांसह मंत्रि‍पदांची शपथ घेतली, शिंदे सरकारमध्ये (Shinde Governemnt) सहभागी झाले. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी हा धक्का होता. पण या धक्क्यातून सावरत पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. त्यावेळी पवार आधी बारामती जातील असा अंदाज होता. पण पवारांनी थेट येवला गाठलं आणि पहिला दणका दिला तो छगन भुजबळ यांना.

राज्यात आज जे काही प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत त्यातील एक नाव म्हणजे छगन भुजबळ आहे. भुजबळ यांच्या राजकारणाला आता चार दशकांहुन अधिक काळ झाला. पण त्यांना देशपातळीवर ओळख मिळाली ती शरद पवार यांच्यामुळेच. खुद्द भुजबळ देखील ही गोष्ट नाकारणार नाहीत. पण त्यानंतरही त्यांनी अजितदादांची साथ दिली आणि आपल्याला दुखावलं याचा राग पवारांच्या मनात होता. (Amrita Pawar, Kunal Darade, Manikrao Shinde are interested in contesting elections from Yewla constituency against NCP leader Chhagan Bhujbal.)

आता विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना भुजबळ यांच्या दिमतीला मंत्रिपद आहे, हातात निधी आहे, सोबत अजितदादा आहेत, घड्याळ चिन्ह आहे. पण सोबत नाहीत ते शरद पवार. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाविना त्यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यातच येवला मतदारसंघातून लोकसभेला तुतारीचे उमेदवार भास्कर भगरे यांना लीड मिळाले आहे. मराठा आरक्षण, कांदा प्रश्न याबरोबरच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध अशी आव्हाने आहेत. त्यामुळे भुजबळांसाठी येवला मतदारसंघ काहीसा अवघड झाला असल्याचे बोलले जाते.

पाहुया नेमकी काय आहे येवल्यामधील परिस्थिती, आपल्या ग्राऊंड झिरो या विशेष मालिकेमध्ये…

छगन भुजबळ यांच्यासाठी येवला आता जेवढा अवघड बनल्याचे चित्र आहे, तेवढा अवघड त्यांच्यासाठी यापूर्वी कधीच नव्हता. 2004 पासून ते येवला मतदारसंघातून निवडून येत आहेत. तेव्हापासूनच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये वाढच झाली आहे. 2004 मध्ये त्यांना 79 हजार 306 इतकी मते होती. त्यात त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील यांचा 35 हजार 649 मतांनी पराभव केला. या पाच वर्षांमध्ये भुजबळांनी येवल्यात आपले चांगले बस्तान बसवले. त्यामुळे 2009 मध्ये समर्थक असलेले माणिकराव शिंदे हेच विरोधात उतरुनही त्यांनी 50 हजारांनी विजय मिळवला. 2014 मध्ये एक लाख 12 हजार आणि 2019 मध्ये एक लाख 26 हजार मते मिळाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांना धूळ चारली.

वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतंय का? उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

पण यंदाची निवडणूक भुजबळांसाठी आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे. याचे पहिले कारण म्हणजे त्यांनी शरद पवारांना सोडून दिलेली अजितदादांना साथ. मग दुखावलेल्या पवारांनीही आपली पहिली जाहीर सभा येवल्यातच घेतली होती, हे दुसरे कारण. तिसरे कारण आहे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे हे वारंवार भुजबळ यांना लक्ष्य करत असल्याने मराठा समाज उघडपणे जरांगेंना साथ देत आहे. येवल्यातील अल्पसंख्याक समाजाने कायमच भुजबळ यांना साथ दिली आहे. परंतु, भुजबळ सध्या भाजपबरोबर असलेल्या अजित पवार गटात असल्याने हा समाज त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता अधिक आहे.

येवल्यामधील कांदा उत्पादकांचा प्रश्नही भुजबळ यांना सोडवता आलेला नाही. निर्यातबंदी, निर्यात शुल्क यासंदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याची झळ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांना बसली. येवला विधानसभा मतदारसंघात भास्कर भगरे यांना 13 हजारांचे मताधिक्य मिळाले. भुजबळ यांच्यासाठी हे मताधिक्य धोकादायक मानले जात आहे. मतदारसंघातील पाणी समस्या कायम आहेत. भुजबळ यांनी येवल्यात केवळ भव्य शासकीय इमारती उभ्या केल्या. परंतु, इतर विकास कामे केली नसल्याचा आक्षेप त्यांच्याविषयी घेतला जातो.

पी.एन. गेले… वारसा राहुल पाटलांकडे : चंद्रदीप नरकेंना ‘करवीर’ अजूनही हाताबाहेर?

आता शेवटचा महत्वाचा प्रश्न राहतो तो भुजबळ यांना आव्हान कोण देऊ शकते? तर निफाड तालुक्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांचे स्वागत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी केले होते. त्यांनी उघडपणे भुजबळ यांच्याविरोधात उमेदवारीची मागणी केली आहे. याशिवाय माणिकराव शिंदे यांनीही दावेदारी कायम ठेवली आहे., ठाकरे गटाकडून आमदार दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हेही इच्छुकांच्या रांगेत आहेत. आता या सर्व प्रश्नांना भुजबळ कसे टॅकल करतात, मराठा समाज, अल्पसंख्यांक समाज यांचा पाठिंबा कसे मिळवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube