आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्पाचं मतदान पार पडलं. आसाम, केरळ, तामिळनाडू , आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये आधीच मतदान झालं होतं. यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदार संघ आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व विधानसभा निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. आज निवडणूक निकालाचे एक्झिट पोल हाती आले आहेत. या एक्झिट पोलनुसार राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अनुक्रमे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हेच विजयी होणार असल्याचं समोर आलं आहे.
अक्षय कर्डिले यांना किती मत मिळणार?
रिंगसाईड रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 1 लाख 42 हजार 500 एवढं मतदान पडण्याची शक्यता आहे. एकूण झालेल्या मतदानाचा विचार केल्यास कर्डिले यांना 76 टक्के मतदान झाल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25 हजार 500 एवढं मतदार होण्याची शक्यता आहे, त्यांना 14 टक्के मत पडू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे मोठ्या फरकाने विजयी होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांना किती मतं मिळणार?
एक्झिट पोलच्या अंदाजनुसार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात मतं पडणार आहेत. रिंगसाईड रिसर्च या संस्थेच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीत सुनेत्रा पवार यांना 92 ते 97 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यांना एक ते दोन लाख मतं मिळू शकतात. तर दुसरीकडे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राहुल कर्डिले यांनादेखील 78 ते 83 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांना 95 हजार ते 1 लाख मतं मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीच्या मतदारांनी सुनेत्रा पवार यांना भरभरून मतदान केल्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांना तब्बल 97 टक्के मतं मिळणार असतील तर हा एका प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्याचे प्रयत्न चालू होते. सुरुवातीला काँग्रेसने या मतदारसंघासाठी आपला उमेदवार दिला होता. परंतु नंतर सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करा, असं आवाहन केल्यानंतर त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. असे असताना आता एक्झिट पोलचे आकडेदेखील त्यांना विक्रमी मतदान होणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांना नेमकी मतं किती मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
