मतांच्या दुष्काळातही निवडणुकांचा ‘नाद’ भारी; बिचुकले अन् करूणा मुंडेंचा पराभवाचा ‘रेकॉर्ड’ कायम!
Baramati : स्वतःला 'भावी मुख्यमंत्री' म्हणवून घेणाऱ्या बिचुकले यांच्यासाठी निवडणूक लढवणे हा जणू एक छंद झाला आहे.
Baramati By Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावे विजयासाठी नाही, तर केवळ निवडणूक लढवण्यासाठी ओळखली जातात. यामध्ये साताऱ्याचे ‘कवी’ अभिजीत बिचुकले आणि करूणा धनंजय मुंडे ही दोन नावे आघाडीवर आहेत. अनेक निवडणुकांमध्ये नशीब आजमावूनही या दोघांच्या पदरी अद्याप केवळ पराभवच पडला आहे. आज (दि.4) समोर आलेल्या बारामती पोटनिवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर बिचुकले आणि करूणा मुंडे यांच्या आतापर्यंतच्या निवडणूक प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
अभिजीत बिचुकले: ‘भावी मुख्यमंत्री’ ते पराभवाचा विक्रमी प्रवास
अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. स्वतःला ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणवून घेणाऱ्या बिचुकले यांच्यासाठी निवडणूक लढवणे हा जणू एक छंद झाला आहे. त्यांनी 2019 मध्ये वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र, तिथे त्यांना नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला.
त्याशिवाय त्यांनी 2024 मध्ये बिचुकले यांनी पुणे आणि सातारा येथून लोकसभा निवडणुकीत एकाच वेळी दोन मतदारसंघांतून अर्ज भरले होते. पुण्यातून त्यांनी मुरलीधर मोहोळ आणि साताऱ्यातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले होते, परंतु दोन्ही ठिकाणी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. एवढेच नव्हे तर, साताऱ्यातून त्यांनी अनेकदा विधानसभा आणि पोटनिवडणुका लढवल्या आहेत. अगदी साताऱ्याच्या गादीचा आदर राखण्याऐवजी त्यांनी थेट राजघराण्यातील उमेदवारांविरुद्धही निवडणूक लढवली आहे. विशेष म्हणजे बिचुकले यांनी राष्ट्रपती पदासाठीही अर्ज भरण्याची तयारी दर्शवून सर्वांचे लक्ष वेधले होते.
West Bengal Result : 4 मई ‘दीदी’ गई! बंगालमध्ये बॅनर्जींची ‘ममता’ कमी करणारे शाहंचे 4 ‘धुरंधर’
करूणा मुंडे: कौटुंबिक संघर्षाची राजकीय वाटचाल
धनंजय मुंडे यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या करूणा मुंडे यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’ स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला, पण त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. 2024 मध्ये त्यांनी परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता, मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद करण्यात आला होता. परळीतून अर्ज बाद झाल्यावर त्यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढवली, जिथे त्यांना केवळ 511 मते मिळाली.
2024 मध्ये बीड लोकसभा निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले होते, परंतु तिथे त्यांना अवघी 1599 मते मिळाली. याशिवाय त्यांनी 2022 मध्ये कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही अपक्ष म्हणून सहभाग नोंदवला होता, पण तिथेही त्यांना मतदारांनी गांभीर्याने घेतले नाही. करूण मुंडे नेहमीच ‘महिलांवरील अन्याय’ हा मुद्दा घेऊन निवडणूक रिंगणात उतरतात, परंतु ठोस राजकीय पाठबळाअभावी त्यांना प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
Kasba Peth Bypoll अभिजित बिचुकलेंची संपत्ती माहिती आहे का, किती आहे ते?
मतांच्या दुष्काळातही उमेदवारीचा ‘नाद’ खुळा!
लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे आणि अभिजीत बिचुकले व करूणा मुंडे या अधिकाराचा पुरेपूर वापर करताना दिसतात. बारामती पोटनिवडणुकीच्या आजच्या निकालाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, केवळ चर्चेत राहून किंवा वादग्रस्त विधाने करून मतदारांचे प्रेम मिळवता येत नाही.
एकीकडे बिचुकले यांची ‘भावी मुख्यमंत्री’ होण्याची स्वप्ने आणि दुसरीकडे करूणा मुंडे यांचा कौटुंबिक संघर्षातून उभा राहिलेला राजकीय प्रवास, या दोन्ही गोष्टी मतदारांच्या पसंतीस उतरण्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत. वारंवार जप्त होणारी अनामत रक्कम आणि शेकड्यांत मिळणारी मते असूनही, या दोन्ही उमेदवारांचा निवडणूक लढवण्याचा उत्साह कमी झालेला नाही. राजकारणात ‘गंभीर’ उमेदवार म्हणून ओळख निर्माण करण्यात ते अपयशी ठरले असले, तरी निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मनोरंजन’ आणि ‘चर्चा’ घडवून आणण्यात मात्र हे दोघेही नेहमीच ‘विजेते’ ठरतात. आता पुढच्या निवडणुकीत हे ‘नित्य उमेदवार’ नवीन कोणता मुद्दा घेऊन येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.