पुष्पगुच्छाच्या बहाण्याने जवळ आले अन् उद्योगपतीवर हल्ला केला! बारामतीतील घटनेनंतर सुनेत्रा पवारांचा पोलिसांना इशारा
सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत हल्लेखोरांनी पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ येत त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे.
Industrialist Rana Suryavanshi attacked in the vicinity of Baramati Airport : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत हल्लेखोरांनी पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ येत त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन करून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बारामती विमानतळ परिसरात उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी राणा सूर्यवंशी विमानतळ परिसरात असताना काही हल्लेखोर पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आले. त्यानंतर अचानक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, सूर्यवंशी यांच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरांचा प्रयत्न हाणून पाडला. या झटापटीत हल्लेखोराची रिव्हॉल्व्हर खाली पडल्याची माहिती आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने सूर्यवंशी यांच्या उजव्या हातावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या हातात गोळी शिरल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल वापरली आक्षेपार्ह भाषा? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेत्यांचा संताप
या घटनेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांनी या प्रकरणातील हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, राणा सूर्यवंशी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी सदिच्छाही व्यक्त केल्या आहेत.
बारामतीसारख्या महत्त्वाच्या परिसरात उद्योगपतीवर झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करून हल्लेखोरांना कधी अटक करतात आणि त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.