शिवसेनेचे आक्रमक आणि लढवय्ये नेते, मुलूख मैदानी तोफ अशी रामदास कदम (Ramdas Kadam) अर्थात रामदास भाईंची ओळख. त्यांना एखादी गोष्ट खटकली तर ते त्याविरोधात बोलायला, टीका करायला कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. मग ते नेते स्वतःच्या पक्षातील असोत, भाजपमधील असोत की विरोधी पक्षातील असोत. ते टीका करताना तुटूनच पडतात. मध्यंतरी ते स्वतःच्याच पक्षाचे खासदार असलेल्या गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्याशी वाकडे घेतले होते. गत वर्षभरापासून रामदार कदम बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर खार खाऊन आहेत. आता हा वाद थेट एकमेकांना मारण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. कदम यांनी मुंबई-गोवा एक्सप्रेस हायवेच्या कामावरुन चव्हाण यांना कुचकामी म्हटले हे या वादाचे निमित्त ठरले. त्यावर चव्हाण यांनी रामदासभाईंना तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आणि तोंड फोडण्याची धमकीही दिली. पण रामदास कदम यांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर एवढा राग का? त्यांना चव्हाण यांची नेमकी कोणती गोष्ट खटकत आहे? की खरंच केवळ रस्त्याचे निमित्त आहे? (Why does Shiv Sena leader Ramdas Kadam constantly criticize BJP minister Ravindra Chavan)
खरंतर मुंबई-गोवा हायवे हा विषय आता ना वादाचा राहिलाय, ना आंदोलनाचा. रोजचं मड त्याला कोण रडं अशी या हायवेची अवस्था झाली आहे. गत चौदा वर्षांपासून रखडलेल्या या हायवेपुढे खुद्द नितीन गडकरी यांनीही हात टेकले आहेत. आता या हायवेच्या विषयावरुन रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. ‘नुसती शाईनिंग मारण्यापेक्षा कामं करावी, अनेक कामं झालेली नाहीत. एक रस्ता असेल तर त्यात खड्डेच खड्डे आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी? खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यायला हवा’, अशी मागणी रामदास कदम यांनी केली. पण कदम यांचा खरा राग वेगळाच आहे.
सिद्धेश आणि योगेश अशी रामदास कदम यांना दोन मुले. या दोन्ही मुलांवर रामदासभाईंचे भरपूर प्रेम आहे. त्यामुळे ते स्वतः निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झाले असले तरीही दोन्ही मुलांसाठी धडपडताना दिसतात. सिद्धेश कदम यांच्या उमेदवारीसाठी मुंबई उत्तर-पश्चिम या गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघातून प्रयत्नशील होते. पण कीर्तिकर यांनी ही जागा सिद्धेशसाठी ही जागा सोडण्यास नकार दिला. इतकेच नाही तर ऐनवेळी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत ठाकरे गटाचे उमेदवार असलेला स्वतःचा मुलगा अमोल कीर्तीकर यांना पाठिंबा दिला. परिणामी शिंदेंना ऐनवेळी रवींद्र वायकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागली आणि ते इथून निवडूनही आले. त्यानंतरही शांत बसतील ते कदम कसे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून सिद्धेश कदम यांची प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावून घेतली.
योगेश कदम यांच्याबाबतीतही असेच आहे. 2019 मध्ये स्वतः माघार घेऊन, माजी आमदार सुर्यकांत दळवी यांचे तिकीट कापून ते योगेश कदम यांना मिळवून दिले. योगेश कदम इथून निवडूनही आले. पण निकाल लागताच शांत असलेल्या रामदासाभाईंच्या संतापाचा कडेलोट झाला. भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्याविरोधात काम करत राष्ट्रवादीला मदत केले असा आरोप करत त्यांनी वात पेटवून दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार येताच कदम पिता-पुत्रांनी शिंदेंची साथ दिली. त्यावेळी एका वृत्तवाहिनीच्या स्क्रीनवर त्यांच्या डोळ्यातील अश्रू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते.
आता इथून आपल्या मूळ प्रश्नाच्या उत्तराकडे येऊ. शिंदे सरकारमध्ये रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले. तसा चव्हाण यांचा दापोली, खेड तालुक्यातील राजकारणाशी थेट संबंध नाही. तरीही रामदास कदम यांच्या आरोपांनुसार, बांधकाम मंत्री झाल्यापासून रवींद्र चव्हाण हे योगेश कदम यांचे राजकारण संपवण्याच्या मागे लागले आहेत. लोकसभेवेळी रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून दापोलीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सभा झाली. त्या सभेत सावंत यांनी कोकणातील तिन्ही जागा भाजपच जिंकणार असा दावा केला. हाच दावा रामदासभाईंच्या डोक्यात गेला. तिथेच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावरचा सगळाच राग काढला. कोण तो रवींद्र चव्हाण? विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातून 10-15 कोटींची कामे करतो. स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून भूमिपूजन करतो, कोण तो केळकर? कोण तो गोव्याचा मुख्यमंत्री दापोलीत जाऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर अधिकार सांगतो? असा सवाल कदम यांनी केला.
थोडक्यात रवींद्र चव्हाण आपल्या मुलाच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतात असा रामदास कदम यांचा आक्षेप आहे. चव्हाण यांनीही दापोली, खेड तालुक्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे हे खरेच आहे. विविध पक्षप्रवेश हे चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडतात. लोकसभेवेळी चव्हाण यांच्याच मार्गदर्शनात रणनीती ठरली होती, पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही चव्हाण यांच्याच मतानुसार होतात. शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी हेही सध्या भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे तिकीटासाठी कदम यांच्यापुढे महायुतीतूनच प्रबळ दावेदारी तयार झाली आहे. ही दावेदारी तयार होण्यामागेही मंत्री चव्हाण यांचीच रणनीती असल्याचे बोलले जाते. अशात लोकसभेला महायुतीला ना गुहागरमधून लीड मिळाले, ना दापोलीमधून. त्यामुळे दापोलीच्या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. याच सगळ्यामुळे सध्या रामदास कदम यांना रवींद्र चव्हाण यांचा राग येणे स्वाभाविक म्हणावे लागले. आता या वादावर महायुतीचे नेते कसे तोडगा काढतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.