Download App

रावेरच्या आखाड्यात ‘नव्या भिडूं’मध्ये कुस्ती; भाजपचा पैलवान ‘चौधरींना’ थांबवणार?

रावेर

जळगाव आजच्या घडीला भाजपचा हक्काचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात भाजपविरोधी लाट असली तरीही जळगावमध्ये डोळे झाकून भाजपचाच (BJP) उमेदवार निवडून येतो. मागच्या अनेक वर्षांपासून इथले दोन्ही खासदार भाजपचे आहेत, एखादा दुसरा अपवाद सोडल्यास सगळे आमदार भाजपचे आहेत. जिल्हा परिषद, जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायत ते बहुतांश नगरपालिका आणि महानगरपालिकेवरही भाजपची सत्ता होती. पण असा हा अभेद्य भाजपचा बालेकिल्ला कधीकाळी काँग्रेसच्या (Congress) ताब्यात होता. काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशनही या जिल्ह्यात झाले होते. हे काँग्रेसचे अधिवेशन झालेला आणि मगाशी अपवाद म्हणून उल्लेख केला तो मतदारसंघ म्हणजे रावेर. (Will there be a fight between Dhananjay Chaudhary of Congress and Amol Jawle of BJP in Raver Assembly Constituency?)

याच रावेर विधानसभा मतदासंघाविषयी जाणून घेऊ लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी, यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द या तालुक्यातून सुरु केली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उच्च स्थानापर्यंत त्यांनी आपला ठसा उमटवला. धनाजी नाना चौधरी यांनी काँग्रेसचे ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशन भरवून खान्देशमध्ये स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. वडिलांनंतर मधुकरराव चौधरी राजकारणात सक्रिय झाले. 1957 मध्ये ते रावेरचे आमदार झाले. त्यानंतर ते 1980 पर्यंत रावेरचे आमदार होते. 1980 मध्ये रामकृष्ण पाटील यांनी मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवला. 1985 मध्ये मात्र गुणवंतराव सरोदे यांनी या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवले.

पुढे 1990 मध्ये पुन्हा एकदा मधुकर चौधरी यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. यात ते निवडून आले आणि थेट विधानसभेचे अध्यक्ष झाले. 1995 मध्ये मात्र चौधरी यांचा भाजपच्या अरुण पाटील यांच्याकडून अवघ्या पाच हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून दूर झाले. मधुकरराव चौधरी यांचा वारसा मुलगा शिरीष चौधरी यांनी पुढे सुरू ठेवला. 1999 मध्ये ते राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले. पण त्यांचा पराभव झाला. तर काँग्रेसचे राजाराम महाजन निवडून आले. 2004 मध्ये भाजपचे अरुण पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले. तर आघाडीच्या राजकारणात चौधरी यांना थांबवावे लागले.

मराठा चेहरा, एक गठ्ठा मतदान; महाजनांविरोधात पवारांच्या डोक्यात खास प्लॅन

पण 2009 मध्ये चौधरी यांनी बंडखोरी करत अपक्ष आमदारकी जिंकली. 2014 मध्ये आघाडीच्या स्वतंत्र लढण्याचा चौधरींना तोटा झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीची मते विभागली गेली. शिवसेनेची फारशी ताकद नसल्याने भाजपला फटका बसला नाही. त्यातून भाजपचे हरीभाऊ जावळे निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा शिरीष चौधरी यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक जिंकली. हरीभाऊ जावळे यांचा थोडक्यात पराभव झाला. आता शिरीष चौधरी इथले विद्यमान आमदार आहेत. पण यंदा त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर हरीभाऊ जावळे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघाला नवीन आमदार मिळणार आहे.

काँग्रेसच्या वतीने शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आमदार चौधरी यांनी मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञ सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी मुलाच्या राजकीय कारकीर्दीला त्यांनी सुरुवात करून दिली. विधानसभेचे तिकीट त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मुलासाठी मागून घेतले. या सोहळ्याला काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे धनंजय यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे.

Ground Zero : अनिल भाईदास पाटलांना घरी बसवणार? पवारांचा कडेकोट बंदोबस्त

पण भाजपचीही या मतदारसंघाव मडबूत पकड आहे हे नाकारुन चालणार नाही. भाजप खासदार रक्षा खडसे यांना 2019 मध्ये या विधानसभा मतदारसंघातून 39 हजारांचे तर 2024 मध्ये 35 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्या सातपुड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे भाजपलाही इथे विजयाचा आत्मविश्वास आहे. यंदा भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे, नंदू महाजन आदींची नावे चर्चेत आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार मनीष जैन इच्छुक आहेत. जैन यांनी स्वत: येथून उतरण्याचा इरादा बोलून दाखविला आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरीही प्रहारकडून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

रावेर मतदारसंघात मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध मतदारांची संख्या जास्त आहे. त्यासोबत गुर्जर, धनगर, माळी, कोळी आदिवासी समाजही या ठिकाणी निर्णायक आहे. रावेर मतदारसंघातील प्रश्नांबाबत बोलायचे तर मेगा रिचार्ज प्रकल्प, केळीवर आधारित प्रकल्पांची निर्मिती, बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्ग, रावेर आणि यावल येथे एमआयडीसीची उभारणी, उच्च शिक्षणाची व्यवस्था, शेती रस्ते मजबुतीकरण, 2006 च्या अतिवृष्टीत वाहून गेलेल्या दुर्लक्षित पाझर तलावांची बांधणी आणि दुरुस्ती, महिला बचत गटांसाठी लघुउद्योग आणि इतर विषय महत्त्वाचे आहेत. आता यंदा सगळेच उमेदवार नवखे असणार आहेत. त्यामुळे हे प्रश्न नवखे आमदार कसे सोडवतात हे बघणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

follow us