Ground Zero : अनिल भाईदास पाटलांना घरी बसवणार? पवारांचा कडेकोट बंदोबस्त

Ground Zero : अनिल भाईदास पाटलांना घरी बसवणार? पवारांचा कडेकोट बंदोबस्त

“अनिल पाटील पुन्हा विधानसभेवर निवडूण जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ…” या एकाच वाक्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीत अमळनेरमध्ये काय करायचे, याचे पिक्चर क्लिअर केले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना साथ दिलेल्या आमदारांचा राग तर शरद पवार यांना आहेच. पण त्याहुन जास्त राग आहे, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांचा. अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) हे त्यापैकीच एक मंत्री. यंदाच्या निवडणुकीत त्यांना बसवण्याचा चंगच शरद पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी त्यांचेकडे पाच इच्छुकांचे पर्याय आहेत. आता यापैकी शरद पवार कोणत्या इच्छुकाची निवड करणार आणि त्यात ते यशस्वी होणार का? की शरद पवारांच्या आव्हानाला चकवा देत अनिल भाईदास पाटील पुन्हा आमदार होणार? (Who will be the candidate of NCP Sharad Chandra Pawar party against Anil Bhaidas Patil of NCP in Amalner Assembly Constituency?)

नेमकं काय घडतंय अमळनेर विधानसभा मतदारसंघात, पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर म्हणजे प्रचंड ऐतिहासिक आणि तेवढाच धार्मिक तालुका. पूज्य साने गुरुजी यांच्या वास्तव्याने पुनित झालेला हा तालुका स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात ऐतिहासिक आणि सामाजिक चळवळींचे केंद्र राहिला आहे. याशिवाय संत सखाराम महाराज यांची पावन भूमी आहे. देशभरात प्रसिद्ध असलेले जुने मंगळग्रह मंदिरही इथेच आहे. अझीम प्रेमजी यांचे उद्याेगपती वडील हाशम प्रेमजी यांनी 1947 मध्ये ‘वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्राॅडक्ट्स लिमिटेड’ची अर्थात विप्राेची स्थापनाही याच अमळनेरमध्ये केली हाेती.

अशा या ऐतिहासिक आणि सामाजिक तालुक्यातील मतदार राजाही तेवढाच प्रगल्भ आहे. इथला मतदार हा कोण्या एका पक्षासाठी बांधिल नाही. त्यामुळेच 2004 नंतर इथून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवीन उमेदवार निवडून आला आहे. म्हणूनच प्रत्येक आमदाराला आपल्याला पुढची टर्म मिळेलच याची गॅरंटी देता येत नाही. पुढच्या वेळी निवडून यायचे असेल तर आत्ताच्या खेपेला काम केलेच पाहिजे आणि जनतेचा विश्वास संपादन केलाच पाहिजे, याचा दबाव इथल्या आमदारांवर दिसून येतो. त्यानंतरही अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याची रिस्क घेतली. याची बक्षिसी म्हणून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्याच जोरावर ते अमळनेर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी तयारी करत आहेत.

Ground Zero : सुहास कांदेंचा डाव, निवडणुकीपूर्वीच ‘भुजबळ’ क्लिन बोल्ड!

खरंतर अमळनेर मतदासंघ कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही. 1972 पर्यंत इथे काँग्रेसचे आमदार होते. 1978 मध्ये गुलाबराव वामनराव पाटील यांच्या रूपाने जनता दलाचा आमदार निवडून आणला. 1980 आणि 1990 मध्ये निवडून येत त्यांनी जनता दलाची ज्योत तेवत ठेवली होती. 1995 साली बी. एस. पाटील हे पहिल्यांदाच भाजपचे आमदार निवडून आले. पाटील यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2009 पर्यंत हा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसकडे होते. मात्र 1990 पासून काँग्रेसला इथे यश मिळालेले नाही.

2009 पासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलले. भाजपकडून बी.एस.पाटील यांचे शिष्य अनिल भाईदास पाटील यांना तिकीट मिळाले. तर शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केलेल्या कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी बंडखोरी केली. मुळच्या पारोळ्याच्या असलेल्या साहेबराव पाटील यांनी आश्चर्यकारकरित्या या मतदारसंघातून विजय मिळविला. त्यावेळी राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. अजित पवार यांचे ते निष्ठावंत बनले. “एकाच वादा अजितदादा” असा साहेबराव पाटलांचा नारा होता. अजितदादांनीही त्या पाच वर्षांत अमळनेरसाठी तब्बल 2200 कोटींचा निधी दिला. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठीच साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. पण त्यांचा दारूण पराभव झाला.

साहेबराव पाटील यांचा पराभव केला तो नंदुरबारच्या शिरीष हिरालाल चौधरी या अपक्ष उमेदवाराने. त्या निवडणुकीत साहेबराव पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर 49 हजार 910 मते मिळवत भाजपचे अनिल भाईदास पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिरीष चौधरी 68 हजार मते घेत निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा समीकरणे बदलली. अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तर भाजपने शिरीष चौधरी यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली. राष्ट्रवादीची मध्यम स्थिती आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव असतानाही अनिल भाईदास पाटील यांनी साडे आठ हजारांच्या मताधिक्याने चौधरी यांचा पराभव केला. अजितदादांच्या बंडानंतर त्यांनीही महायुतीत जात मंत्रिपद मिळविले.

दानवेंच्या घराला यंदा आमदारकीचाही ‘चकवा’? 862 मतांनी वाढवली धाकधूक

आता ‘ज्याचा आमदार त्याची जागा’ असे महायुती आणि महाविकास आघाडीचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे महायुतीतून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल आणि अनिल भाईदास पाटील हेच उमेदवारी करतील हे जवळपास निश्चित मानले जाते. तर माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपकडून इच्छुक आहेत. मात्र महायुतीमुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते पुन्हा अपक्ष लढण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याची माहिती आहे. कधीकाळी काँग्रेसकडून लढलेल्या आणि आता भाजपमध्ये असलेल्या ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील याही विधानसभेची तयारी करत आहेत. मात्र संधी मिळण्याची शक्यता नसल्याने त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. काहीच दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटही दिली होती.

अमळनेरची जागा जिंकण्यासाठी शरद पवार यांनीही जवळपास वर्षभरापासून तयारी सुरू केले आहे. पवार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात अमळनेरमध्येही सभा घेतली होती. या सभेतच भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ते तुतारी चिन्हावर उभे असतील असे बोलले जाते. कृषीभूषण साहेबराव पाटील हेही तयारी करत असल्याने ते देखील शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात असे बोलले जाते. दोन आठवड्यांपूर्वीच अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अमळनेरमध्ये पोहोचली होती. त्यावेळी अजितदादा स्वतः साहेबराव पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या राजभवन या निवासस्थानी गेले होते.

पण पाटील अजितदादांना भेटलेच नाही. त्यामुळे अजितदादा वैतागून, चिडून पाटील यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्यातून एकप्रकारे आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे पाटील यांनी संकेत दिले होते. याशिवाय सचिन पाटील, श्याम पाटील आणि प्रशांत निकम यांच्याही नावाची चर्चा आहे.  अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र काँग्रेसने इथली शेवटची निवडणूक 1985 साली जिंकली होती. कॉंग्रेस पक्षाचे या ठिकाणी विशेष संघटन नाही. संघटन तयार करण्यासाठी नेत्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

एका बाजूला हे चित्र असतानाच अमळनेर मतदारसंघ लोकसभेला मात्र भाजपलाच साथ देतो. मागील तीन लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला 50 हजारांपेक्षा हजारांच्यावर मताधिक्य मिळाले आहे. यंदा तर स्मिता वाघ स्थानिक असल्याने, अनिल पाटील आणि शिरीष चौधरी हे दोन्ही आजी माजी आमदार सोबत असल्याने भाजपला इथून 71 हजारांचे लीड मिळाले आहे. ता स्मिता वाघ यांना मिळवून दिलेले लीड कायम राखण्याचे आव्हान अनिल पाटील यांच्यापुढे आहे. तर गेलेली जागा पुन्हा खेचून आणण्याचे आव्हान शरद पवार यांच्यापुढे असणार आहे.

यात आता तुम्हाला काय वाटतं? अमळनेरची जनता पुन्हा अनिल पाटील यांना साथ दिली साथ देईल? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube