पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ मोदी यांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत मध्यवर्ती भागात येणे टाळल्यास वाहतूक कोंडीचा सामाना पुणेकरांना करावा लागणार नाही. (A major change in the traffic and transport system in Pune city in the wake of Prime Minister Narendra Modi’s visit)
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ यावेळेत तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील. वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनन्यसाधारण नेतृत्व आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे देश सातत्याने पुढे जातो.य त्यामुळे हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना देण्यात येत असल्याचे टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे 41 वे मानकरी ठरणार आहे.स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारताची ‘मिसाईल वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ टेसी थॉमस यांना गेल्या वर्षी म्हणजेच 2022 च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. टेसी थॉमस यांनी अग्नी-IV आणि अग्नी-V या क्षेपणास्त्र प्रणालींसाठी प्रकल्प संचालक म्हणून केलेलं काम आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होते. पंतप्रधान मोदींपूर्वी मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी या माजी पंतप्रधानांना तर शरद पवार, राहुल बजाज, सायरस पूनावाला यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.