Download App

आमच्याकडे उमेदवारी मागितली, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न…’ अजित पवारांचं विधान!

पुणे : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवडच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, स्थानिक प्रभावी नेते राहुल कलाटे यांनीही ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला. यामुळे महाविकास आघाडीसमोर (Mahavikas Aghadi) राजकीय संकट निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.

अजित पवार म्हणाले की, दोन जागा होत्या, त्यापैकी कसबा मतदार संघामधील जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला दिली. तर सर्वांनी नाना काटे यांचा अर्ज दाखल केला आहे. उद्या अर्ज छाणणी आहे, त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काल रात्री उशीरापर्यंत आम्ही या ठिकाणी उमेदवारीसंदर्भात यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु यावरती एकमत झालं नाही. मग सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. माझं बाळासाहेब थोरातांशी देखील बोलणं झालं आणि त्यांना आज आम्ही नाना काटे यांचा अर्ज दाखल करत असल्याचे सांगितले. आमच्याकडे ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली, त्यांनी शांत रहावं म्हणून आम्ही प्रयत्न केलं आहोत, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहतो. राहुल कलाटेंना देखील भेटायला काहीजण गेले होते. परंतु त्यांची काय चर्चा झाली हे मला अद्याप माहित नाही.

याबरोबरच, पंढरपूरची निवडणूकही लढवण्यात आली, कोल्हापूरची निवडणूकही लढली गेली. देगलूरची देखील निवडणूक लढली गेली. फक्त अपवाद आहे, तो मुंबईचा आणि मुंबईची जी पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये मात्र आवाहन केल्यावर प्रमुख पक्षांनी तिथं उमेदवारी दिली नाही. आम्ही आणि शिवसेना, काँग्रेस सर्वांशी चर्चा करत होतो, त्यावेळी असं सर्वांचं मत आलं की, ही निवडणूक लढवावी, यामुळे आम्ही अर्ज दाखल केला असल्याचा अजित पवार म्हणाले.

राहुल कलाटेंना सांगण्याचं आम्ही काम करू, ऐकायचं नाही, ऐकायचं हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. मला मात्र उद्धव ठाकरेंनी सांगितल आहे की, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांना शिवसेनेचा स्पष्ट पाठिंबा राहणार म्हणून… एक नक्कीच सांगेन हलक्यात घेतली तर निवडणूक सोपी नाही. परंतु कष्ट घेतले तर निवडणूक अवघडही नाही. या शहराचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच पिंपरी-चिंचवडमधूनच झाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं.

Tags

follow us