Download App

Amar Mulchandani : सेवा विकास सहकारी बँकेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याच्या मालमत्तांवर ‘ईडी’चे छापे

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दि सेवा विकास सहकारी बँकेचे (Seva Vikas Co-Oprative Bank) माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी (Amar Mulchandani) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात १० ठिकाणी शोध मोहीम राबवली, अशी माहिती सक्त वसुली संचालनालयानेच (Enforcement Directorate) स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. बेहिशोबी शेकडो कोटीचे कर्जवाटप केल्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु, याबाबत इडीने अद्याप अधिकृत दुजोरा दिला नाही.

सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणुकीशी संबंधित पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत सुरू असलेल्या तपासात ईडीने शुक्रवारी (दि. २७) रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अमर मुलचंदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसर अशा एकूण १० ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

दि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक अमर मुलचंदाणी यांच्यासह तीन संचालकांवर १० ठिकाणी सक्त वसुली संचलनालय अर्थात इडीच्या वतीने शुक्रवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली.

पिंपरीतील दि सेवा विकास सहकारी बँकेत संगणमताने बेकायदेशीररित्या, आर्थिक गैरव्यवहार केले असल्याने आरबीआयने कारवाई केली आहे. त्यातच दोन महिन्यांपूर्वी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणी इडीने कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत होती. त्यामुळेच ही करवाई करण्यात येत असावी, अशी शक्यता ठेवीदारांनी व्यक्त केली आहे.

तसेच इतर संचालकांच्या घरीही पोलीसबंदोबस्त ठेवला होता. पिंपरीतील गणेश हॉटेल, तपोवन मंदिराजवळ मिस्ट्री पॅलेस या इमारतीत अमर मुलचंदानी यांचे निवासस्थान आहे. याच ठिकाणी ईडीचे अधिकारी शुक्रवारी सकाळपासून ठाण मांडून होते. तेथे कसून तपासणी करण्यात आली. इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात होते. तसेच जयहिंद महाविद्यालयासमोरील मुलचंदानी यांचे कार्यालय आहे. येथेही मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी चारपर्यंत माजी संचालकांच्या निवासस्थान व कर्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

Tags

follow us