पुणे ; नवले पुल परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असून आज सायंकाळी पुन्हा अपघात झाला आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता.11 फेब्रुवारी) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
नऱ्हे येथील भूमकर पुल चौकात दररोज सकाळी व सायंकाळी मोठी गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने एकच हाहाकार उडाला. या अपघातातील एका क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने क्रेटा हवेत चेंडूसारखी उडाली. काही क्षणाकरिता तिथे असलेल्या नागरिकांना काय झाले हेच समजेना. तिथे असलेले वाहतूक कर्मचारी माधव गोपनर यांच्या जवळून कंटेनर गेला. ते थोडे जरी मागे – पुढे थांबले असते तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र सुदैवाने अनर्थ टळला.
कंटेनरचालक पंकज महापात्रे (वय:५७, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास
मिळालेली माहिती अशी की, शिरवळवरून फ्रिज व इतर साहित्य घेऊन निघालेला कंटेनर नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आला असता कंटेनर चे ब्रेक झाले. दरम्यान, चौकात असणारे वाहतूक कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी त्वरित इतर रस्त्याने येणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कंटेनर समोर असणाऱ्या दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन जण जखमी झाले.
दरम्यान, घटनेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.