Download App

Ashwini Jagtap आमच्यात वाद नाही… ही तर विरोधकांनी उठवलेले वावटळ!

  • Written By: Last Updated:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबामध्ये वाद आहे, असे बोलले जात आहे. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्याबरोबरच शंकर जगताप (Shankar Jagtap) हे देखील पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाही. तर हे केवळ विरोधकांनी जगताप कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने उठवलेले वावटळ आहे, असे चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ‘लेट्सअप’शी बोलताना सांगितले.

अश्विनी जगताप म्हणाल्या की, आमच्या घरामध्ये काहीही वाद नाही. आमचं एकत्र कुटुंब आहे. शंकर जगताप तर मला अगदी लहान भावासारखे आहेत. मुलासारखे आहेत. ते मला आई समजतात. त्यामुळे असं अजिबात काहीही घरामध्ये नाही. आमचं अगदी पहिल्यापासून ठरलेले होतं की ज्याला पक्षाकडून तिकीट मिळेल त्याने निवडणूक लढवायची आहे. पक्षाचा जो आदेश येईल तो पाळायचा. त्याप्रमाणेच आम्ही या निवडणुकीत उतरलो आहे.

स्व. लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना यावेळी अश्विनी जगताप यांनी उजाळा दिला.  अश्विनी जगताप म्हणाल्या की, भाऊ मला नेहमी म्हणायचे अश्विनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला तू चहा देतेस. पण त्यातून काहीही मिळत नाही. त्यामुळे चहा ऐवजी पौष्टिक लाडू देत जा. त्यातून त्यांच्या तब्येतीला फायदा होईल. भाऊंनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांना जीव लावला. आपल्या मुलाला कसा खाऊ म्हणून लाडू देतो. अगदी तसेच त्यांच्या हातावर आम्ही लाडू ठेवतो. त्यामुळे सगळेच कार्यकर्ते मला माई म्हणूनच हाक मारत असे.

चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, कोणीही माघार घेतली नाही, असे सांगत अश्विनी जगताप म्हणाल्या की ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आपल्या घराच्या शेजारी जरी कोणाचं निधन झालं तर आपण त्याच्या घरी दोन भाकरी घेऊन जातो. चहाचे दोन कप घेऊन जातो आणि त्यांचे सांत्वन करतो. पण विरोधकांचे हे वागणं म्हणजे अगदी जीवावर ओरखडे ओढल्यासारखं झालं आहे.

Tags

follow us