Baramati Assembly by election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सुनेत्रा पवार यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. एकट्या सुनेत्रा पवार यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 91 कोटी रुपये आहे. त्यात 23 कोटींची जंगम आणि 67 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर अजित पवार यांच्याकडे 24 कोटींची संपत्ती होती. त्यात 7 कोटी 58 लाख रुपये जंगम, तर 16 कोटी 84 लाख रुपये स्थावर मालमत्ता होती. ही दोघांची संपत्ती आहे.
अनेक बँकाध्ये दहा कोटींची ठेवी
सुनेत्रा पवार यांच्याकडे 9 लाख 75 हजार 600 रुपये रोख रक्कम आहे. तर बँकेतील ठेवी 10 कोटी 58 लाख 78 हजार 161 आहेत. तर त्यांचे पती स्वर्गीय अजित पवार यांच्याकडे 71 लाख 63 हजार 625 रुपये ठेवी आहे. टॅक्टर, ट्रेलर, इनोव्हा गाड्या आहेत.
86 किलो चांदी, आठशे ग्रॅम सोने
सुनेत्रा पवारांकडे 49 हजार 385 ग्रॅम व 27 हजार 423 ग्रॅम असे सुमारे 85 किलो चांदीचे दागिने व वस्तू आहेत. तर सोन्याचे दागिने 860 ग्रॅम आहे. तर 169 ग्रॅम हिऱ्याचे दागिने आहेत. सोने व चांदीचे आजची किंमत 2 कोटी 92 लाख 34 हजार 820 रुपये इतकी होत आहे. तर त्यांचे पती अजित पवार यांच्याकडे 71 लाख 92 हजार 365 रुपयांचे दागिने आहेत.
स्थावर मालमत्ता कुठे-कुठे
बारामती तालुक्यातील काटेवाडी, येळेवाडी, सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, मुळशीमधील गोडाबेवाडी येथे शेतमजमीन आहे. बिगरशेती जमीन जळोची, नांदेड सिटी-हवेली, काटेवाडी येथे आहे. निवासी इमारत कल्याणीनगर, मुंबई शुभदा अपार्टमेंट (वरळी), काटेवाडी घर, सहयोग घर अशी आहे. स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 67 कोटी 67 लाख 12 हजार 530 कोटी रुपये इतके आहे.
सुनेत्रा पवारांवर 16 कोटींचे कर्ज
अॅक्सिस बँकेकडून वाहन कर्ज 20 लाख 2 हजार 751 घेतलेले आहेत. तर इतर कर्ज 16 कोटी 53 लाख 79 हजार इतके आहे. तर अजित पवार यांच्याकडे 4 कोटी 12 लाख कर्ज होते.
प्रतिभा पवार, सुप्रिया सुळेंना पावणे दोन कोटी दिले
शरद पवार यांच्या प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांनी 1 कोटी 82 लाख रुपये दिलेले आहेत. त्यात प्रतिभा पवार यांना 1 कोटी 10 लाख तर, सुप्रिया सुळेंना 71 लाख रुपये दिलेले आहेत. तर सुनेत्रा पवारांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून, त्यातून 6 कोटी 91 लाख रुपयांचे व्याज मिळते.
