पुणे : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराची उभारणी करून श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे अभिनंदन तसेच श्रीरामललांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. उद्या (रविवारी, 11 फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता एरंडवणे भागातील कृष्णसुंदर गार्डन इथून या रॅलीला सुरुवात होणार आहे.
ही नमो पुणे बाईक रॅली म्हात्रे पूल – शास्त्री रोड- माधवराव पेशवे रोड – बाजीराव रोड – शनिवार वाडा – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – एफ.सी. रोड – ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजीनीरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणी संपणार आहे. (Bharatiya Janata Party National Leader Sunil Deodhar has organized a bike rally called ‘Namo Pune Salutation’)
या रॅलीबद्दल बोलताना देवधर म्हणाले, नमो पुणे बाईक रॅलीसाठी नागरिकांची लक्षणीय प्रतिसाद असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या रॅलीत तीन हजारांहून अधिक बाईक चालक आणि पाच हजारांहून अधिक पुणेकर सहभागी होतील. या रॅलीसाठी समाजाच्या सर्व घटकातून पुणेकरांनी नोंदणी केली असून विविध समुदायांच्या लोकांनी या रॅली सहभागी होण्याविषयी इच्छा व्यक्त करत आपला सहभाग निश्चित केला आहे.
दरम्यान, या बाईक रॅलीच्या माध्यमातून देवधर यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. ते सध्या लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी उमेदवारीबाबत घोषणा ही केली आहे. “पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभा निवडणूक लढवणार, मी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक अशी भूमिकाही त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना स्पष्ट केली आहे.
पुणे शहर माझी जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे, असा आपला मानस आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या विधानामुळे खासदारकीसाठी देवधर यांनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. मात्र पक्षाने आपल्या ऐवजी दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिली तरी आपण पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून त्याला निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही देवधर यांनी स्पष्ट केले आहे.