पुणे : ‘ड्रीम 11’ या ऑनलाईन बेटिंग अॅपवर दीड कोटी जिंकून चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र विभागीय चौकशीत त्यांना स्वतःच म्हणणं मांडण्याची मुभा असणार आहे. (Billionaire Somnath Zende suspended after BJP office-bearer’s letter to Devendra Fadnavis)
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमनाथ झेंडे हे क्रिकेटचे चाहते आहेत. सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपमधील 10 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या इंग्लड विरुद्ध बांग्लादेश या सामन्यात त्यांनी ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन बेटिंग अॅपवर टीम सिलेक्ट केली. त्यांनी सिलेक्ट केलेली टीम परफेक्ट बसली आणि त्यात ते तब्बल दीड कोटी रुपये जिंकले. यानंतर त्यांच्या खात्यात पैसेही येण्यास सुरुवात झाली. त्यांच्या या गोष्टीची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणी झेंडे चर्चेत आले.
मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीच अंतर्गत चौकशी केली. यात झेंडे यांच्यावर वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचविल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांचे निलंबन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधील पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबनापूर्वी झालेल्या चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात झेंडे यांनी हा कौशल्याचा खेळ असल्याचे सांगितले होते. हा खेळ बेकायदेशीर नाही. बेकादेशीर असते तर सरकारनेच त्यावर बंदी घातली असती. सरकारची बंदी नाही, याचा अर्थ हा खेळ बेकायदेशीर म्हणता येणार नाही. शिवाय वर्दीवरील फोटो मी व्हायरल केले नाहीत. ते माध्यम आणि मित्रांकडून व्हायरल करण्यात आले होते, असेही त्यांनी म्हंटले होते. मात्र त्यानंतरही झेंडे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, या कारवाईमागे भाजप पदाधिकाऱ्याचे एक पत्र असल्याचे बोलले जात आहे. झेंडे यांनी रक्कम जिंकताच त्यांच्याबाबतच्या बातम्या माध्यमांमधून व्हायरल झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका पदाधिकाऱ्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले. याच पत्रानंतर झेंडे यांच्यावर खातेअंतर्गत चौकशी लावण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तरुण पिढी भरकटत चालली आहे. पैसे मिळवून देणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याची मागणीही केली जात असते. कारण, यामधून अनेकांची फसवणूक झाल्याचीही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यानेच गेमिंगच्या माध्यमातूनच दीड कोटी कमावल्याने समाजात चुकीचा संदेश जात आहे, असे फडणवीस यांना लिहिल्या पत्रात म्हंटले होते.