BJP-Shiv Sena alliance breaks down in Pune : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. त्यामुळे आता निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होत असून उद्यापासून उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. नीलम गोऱ्हे(Nilam Gorhe) यांनी सांगितले की, पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने(Shivsena) सुरुवातीला 123 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले असून आता शिवसेनेकडून एकूण 110 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
यावेळी महायुतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “युतीचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालं असून पुण्यात आम्ही वेगळे लढत आहोत,” अशी अधिकृत घोषणा नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केली. शेवटपर्यंत युतीसाठी शिवसेना आग्रही होती, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे. ‘जे स्वतःला मोठा भाऊ म्हणतात, त्यांनी थोडी शिकस्त करायला हवी होती. मात्र काही जागांवरून आमचं जमू शकलं नाही. त्यामुळे पुण्यात वेगवेगळे लढण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला, असं त्या म्हणाल्या.
पुण्यात भाजपची विजयी सुरूवात; प्रभाग 35 मधून मंजुषा नागपुरे अन् श्रीकांत जगताप बिनविरोध
मात्र राज्यातील इतर अनेक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती झाली असून, त्याचं समाधान असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुती यशस्वीपणे उभी राहिली आहे आणि ही आनंदाची बाब आहे,’ असं त्यांनी सांगितलं. युतीबाबतची शिवसेनेची अधिकृत भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत स्पष्ट करतील, असं सांगत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘आमच्या अग्रक्रमाच्या जागा आम्हाला मिळाव्यात, ही आमची भूमिका होती. त्याचबरोबर काही जागांवर तडजोड करण्याची तयारी देखील आम्ही दाखवली होती.’
दरम्यान, अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता उद्यापासून निवडणूक प्रचाराला अधिक वेग येणार असून, चिन्ह वाटपानंतर पुणे महापालिकेची लढत रंगात येण्याची शक्यता आहे.
