पुणे : मोठ्या घडामोडीनंतर आज भाजपने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होणार आहे.
Maharashtra | BJP releases list of its candidates for by-elections in Chinchwad & Kasba Peth Assembly constituencies. pic.twitter.com/wmQxCoranH
— ANI (@ANI) February 4, 2023
महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये मागे राहिला.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रात्री उशिरा टिळक वाड्यात जाऊन कुणाल टिळक आणि शैलेश टिळक यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या घरातील उमेदवार नसणार अशी शक्यता होती.
चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवड मध्ये जगताप यांच्या घरातच उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप हेदेखील इच्छुक होते पण आता आश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळाली.