यंदाच्या निवडणुकीत भाजपपासून मराठा समाज दुरावला, हे स्वतः भाजपच्या नेत्यांनीही मान्य करतात. ‘विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही गोष्ट भाजपला परवडणारी नाही. आता मराठा समाजाला पुन्हा जवळ आणण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना मंत्रिपदी मिळेल’ असा सर्वांचाच कयास होता. 2019 मध्येही पक्षबदल करतेवेळी त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते.
पण राजेंना थांबवून भाजपने (BJP) पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidha Mohol) यांना पुढे केले. खुद्द मोहोळ यांनीही आपली मंत्रिपदी वर्णी लागेल याचा विचार केला नसावा. मात्र यामुळे आता राजेंसारख्या खासदाराला थांबवून अगदीच नवख्या, पहिल्यांदा निवडून आलेल्या मोहोळांवर भाजपने डाव का खेळला? देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमके आहे तरी काय? जाणून घेवूया याच प्रश्नाचे उत्तर… (BJP has made Pune MP Muralidhar Mohol as Union Minister.)
भाजपच्या यंदा पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या दोन जागा निवडून आल्या. पहिले उदयनराजे भोसले आणि दुसरे मुरलीधर मोहोळ. सांगलीतून संजयकाका पाटील, माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरमधून राम सातपुते यांचा पराभव झाला. भाजपने मंत्रिपदी वर्णी लावताना निर्मला सीतारमण, जे. पी. नड्डा असे निवडक अपवाद वगळता लोकांमधून निवडून आलेले खासदार असा नियम लावला. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि मुरलीधर मोहोळ असे दोनच पर्याय होते. दोघेही मराठा असल्याने दोघांपैकी कोण, यात मुरलीधर मोहोळ यांनी सरशी मारली. भाजप आता मुरलीधर मोहोळ यांना ताकद देऊन नवीन मराठा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करु शकते.
उदयनराजेही मराठा चेहरा असताना मोहोळच का? तर याचे उत्तर आहे पुणे शहर आणि जिल्हा. पुण्यात गत दोन्ही टर्मला भाजपचे लीड साडे तीन लाखांच्या घरात होते. यंदाही भाजपने विजय मिळवला असला तरीही हे लीड अवघ्या एका लाखावर आले आहे. आधी कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचा विजय, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत कमी झालेले लीड हा भाजपसाठी चिंतेचा विषय होता.
याशिवाय पुणे जिल्ह्यात विधानसभेचे तब्बल 21 मतदारसंघ येतात. आगामी चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडसारखी महापालिका आहे, सर्वात मोठी जिल्हा परिषद आहे. याच्याही निवडणुका आगामी काही दिवसांमध्ये होणार आहेत. या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून भाजपने साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांच्याऐवजी पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली असल्याचे बोलले जाते.
मोहोळ यांच्या वर्णीचे तिसरे कारण म्हणजे, भाजपकडे पश्चिम महाराष्ट्रात मास बेस लीडर नाही. कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील, सांगलीमध्ये संजयकाका पाटील, सुरेश खाडे, साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, अतुल भोसले, सोलापूरमध्ये विजय देशमुख, सुभाष देशमुख असे चेहरे भाजपकडे आहेत. पण हे चेहरे त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले. पुण्यात गिरीश बापट यांच्यानंतर मोठी पोकळीच तयार झाली.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला नेहमीच दुसर्या पक्षातील नेत्यांना आयात करुन पक्ष वाढवावा लागला. सध्याचे अनेक चेहरेही आयात केलेलेच आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. याच्या अगदी उलट काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अजित पवार, सतेज पाटील, विश्वजीत कदम, असे नेते तयार केले. आजच्या काळात हे नेते पुण्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे आणि राज्याचे प्रस्थापित नेते झाले आहेत. आता पुण्यातून मोहोळांना ताकद देऊन भाजपचा पश्चिम महाराष्ट्रासाठी एक मास बेस लीडर करण्याचा विचार असावा, असे बोलले जाते.
वर म्हटल्याप्रमाणे पुण्यात गिरीश बापट यांच्यानंतर भाजपकडे बडा नेता नाही. बापट यांच्या जागी भाजपने कोल्हापूरमधून चंद्रकांत पाटील यांना पुण्यात आणले, निवडून आणले. पण पुण्याचे नेते म्हणून ते तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळे अजित पवार यांना काऊंटर करु शकेल असा चेहरा भाजपला अत्यावश्यक होता. जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 पैकी निम्म्या जागांवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दोन खासदार आहेत. दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेतही अजितदादांची चांगली ताकद आहे. आजच्या घडीला अजित पवारांच्या राजकारणाची रेष मोहोळांपेक्षा कितीतरी पटीने निश्चितच मोठी आहे. पण भाजपला कधी ना कधी ही रेष मारायला घ्यावी लागणार होती, हीच सुरुवात मोहोळांच्या रुपाने केली आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा चेहरे आहेत. यात नितीन गडकरी आणि पियुष गोयल हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वरिष्ठ आहेत. रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे हे मंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील किंवा विश्वासातील नाहीत. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यारुपाने देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आपला एक विश्वासू चेहरा उतरवल्याचे दिसून येते. दिल्लीतील राजकारणावर मोहोळ यांच्या माध्यमातून फडणवीस हे लक्ष ठेवून राहू शकतील हे निश्चित.
या सगळ्याच्या तुलनेत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद देऊन भाजपला मराठा चेहरा या व्यतिरिक्त फारसे काही हाती लागले नसते. ना ते मास लीडर म्हणून गणले जातात, ना त्यांच्याकडे एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. गत 15 वर्षांपासून खासदार असूनही त्यांच्याकडे ‘स्वतःची कामगिरी’ म्हणून सांगण्यासारखे काहीही नाही. लोकसभेत सर्वात कमी उपस्थिती असलेला खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एखाद्या खासदाराची जेवढी एखाद्या अधिवेशनातील उपस्थिती असते, तेवढी भोसले यांची 15 वर्षांमधीलही उपस्थिती नाही. प्रश्न विचारणे, चर्चेत सहभागी होणे याही गोष्टींमध्ये ते शून्य आहेत. आजपर्यंत त्यांनी एकाही प्रश्न विचारलेला नाही, एकही खासगी विधेयक मांडलेले नाही, की मांडलेल्या विधेयकाच्या चर्चेत सहभागी झाले. त्यामुळेच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा मुरलीधर मोहोळ उजवे ठरले हे नक्की.