Download App

मंत्रिपद हुकलं, दोष कुणाचा? फडणीसांबरोबर शीतयुद्ध.. सुधीरभाऊंनी काय सांगितलं..

कुणामुळे मंत्रिपद हुकलं, नेतृत्वाचा यात काही रोल आहे का या प्रश्नांची उत्तरे मुनगंटीवार यांनी लेट्सअप मराठीला दिली आहेत.

Sudhir Mungantiwar on minister post : राज्याच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार नाहीत. लोकसभेत पराभव झाला तरी विधानसभेत त्यांनी बाजी मारली. नंतर त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. परंतु, मंत्र्यांच्या यादीत त्यांचं नाव काही नव्हतं. मग, त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. खुद्द मुनगंटीवार यांच्या विधानांतून ही नाराजी जाणवलीही आहे. परंतु, आता पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. भाजपाच्या कार्यक्रमांनाही मुनगंटीवार हजेरी लावत आहेत. बैठकाही घेत आहेत. पण, मंत्रिपद हुकल्याची जाणीव आहे. कुणामुळे मंत्रिपद हुकलं, नेतृत्वाचा यात काही रोल आहे का या प्रश्नांची उत्तरे त्यांनी लेट्सअप मराठीला दिली आहेत.

लेट्सअप मराठीच्या लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. मंत्रिपद गेलं याचा दोष कुणाला देता नेतृत्वाला की नशीबाला असे विचारले असता ‘याचा दोष नशीबाला नाही आणि नेतृत्वालाही नाही. कारण आनेवाला कल जानेवाला है अन जानेवाला कल आनेवाला है. आज जो आपका नहीं वो कल आ सकता है, म्हणून दोष देऊन काय उपयोग? दुःख मानून जीवन जगायचं नसतं. आनंद मानून पुढे जायचं असतं.’

‘जे आपल्यापाशी नाही याची चिंता करायची नसते. जे आपल्याकडे आता आहे याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा विचार मी करतो. हीच फिलॉसॉफी आपण स्वीकारायची. तर जर केलं नाही तर मग अवघड आहे. त्यामुळे या गोष्टी आचरणात आणायला हव्यात. मंत्रिपद जाण्याचं दुःख आपण मानायचंच नाही. एखादा माणूस मला माजी मंत्री म्हणतो तर मी लगेच त्याला टोकतो. माजी म्हणायचंच नाही वर्तमानात जगायचं.’ असे मुनगंटीवार म्हणाले.

देवेंद्रजी माझे मित्र, शीतयुद्ध नाहीच

तुमचं आणि देवेंद्र फडणवीसांचं काहीतरी शीतयुद्ध सुरू असतं अशी राज्याच्या राजकारणात चर्चा असते यावर मुनगंटीवार म्हणाले, ‘माझं मंत्रिपद गेलं म्हणून लोकांना असं वाटतं. पण हे काही खरं नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्रजी पक्षाचे महामंत्री होते. आमचा संबंध हा मैत्रीचा आहे मित्रत्वाचा आहे. त्यामुळे हा प्रश्न कधीच उद्भवू शकत नाही. शीतयुद्ध कशावरून? कारण मी काही त्यांचा स्पर्धक नाही. जे काम हातात असेल त्याचं सोनं करायचं याच गोष्टीची मला जाणीव आहे.’

“शिंदे नाराज नाहीत पण, त्यांना नक्की विचारणार”, मुनगंटीवारांच्या मनात नेमकं काय?

मी आजिबात नाराज नाही

मानवी स्वभावाचा विचार केला तर मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजीच्या चर्चा होत असतील. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत असं वाटत असेल. पण मला तसं काहीच वाटत नाही. मंत्री असणं किंवा नसणं यात मला तरी काहीच फरक वाटत नाही. फक्त मानसिकतेचा फरक आहे. मंत्री असताना कॅबिनेटमध्ये विषय मांडायचे आता नाही तर विधानसभेत मांडायचे. मी आजही बैठका घेतो. पण फक्त आवाहन करतो. निर्देश देत नाही, असे सुधीर मुनगंटीवार एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.

अटलजींना पाहून राजकारणात आलो..

खरंतर मी अटल बिहारी वाजपेयी यांना पाहूनच राजकारणात आलो. नितीन गडकरी, स्व. प्रमोद महाजन यांचा आदर्श माझ्यासमोर होता. वयाच्या पाचव्या वर्षात असताना अटलजी माझ्या घरी आले होते. माझे वडील संघाचे स्वयंसेवक होते. 1989 मध्ये एमफीलचे शिक्षण घेताना एकदा माझ्या भाषणाला अटलजी आले होते. अटलजी स्टेजवर आले अन् विचारलं कौन उमेदवा है, तेव्हा सगळ्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं. त्यावेळी अटलजींनी विचारलं तुमचं भाषण झालं का.

पण त्यावेळी माझं भाषण होणार नाही असं ठरलेलं होतं. पण अटलजींनी यास नकार दिला. लोकसभेचा उमेदवार असताना त्याचं भाषण होणार नाही असं कसं चालेल असे अटलजी म्हणाले. त्यावेळच्या माझ्या नेत्यांनी मला सांगितलं की दोन तीन मिनिटांपेक्षा जास्त बोलायचं नाही. मी तीन मिनिटं भाषण केलं. नंतर अटलजी उभे राहिले. ते म्हणाले मै भविष्यवाणी करता हुं की यह लडका आगे महाराष्ट्र की सभा में जाएगा.

ते खरं ठरलं त्यानंतर पुढे एप्रिल 2010 रोजी मी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झालो. त्यानंतर 50 कार्यकर्त्यांना घेऊन मी थेट अटलजींना भेटण्यासाठी थेट दिल्लीला गेलो होतो. पण त्यावेळी त्यांचा स्वरकंठच काढला होता. त्यावेळी त्यांच्या जावयाने माझ्याबद्दल त्यांना माहिती दिली होती.

follow us