पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळं आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी व्यक्त केलाय.
आजारपणामुळं भाजप खासदार गिरीश बापट काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari),राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आदींनी बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच बापट यांना घरी सोडण्यात आले. कसबा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापट यांची अचानक भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, गिरीश बापटांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो, त्यांची तब्बेत बरी नाही, आम्ही जुने मित्र आहोत. सदिच्छा भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते लवकर बरे होतील आणि कामाला लागतील, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, दोन्ही आमदारांची अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी आणि सध्या आमचंच सरकार असल्यानं मतदार आम्हाला साथ देतील, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
Devendra Fadnavis : उरलेसुरले दहा-पंधरा निघून जातील या भीतीने…
कसब्याच्या चिंता करू नका, मी इकडे बसलो आहे. आपलं नेटवर्क आहे. कामाला लागलो आहे. या दोन्ही जागांवर गेली अनेक वर्षे भाजपचे आमदार काम करतायत, लोकांचा भाजपच्या आमदारांवर विश्वास आहे. या मतदारसंघात कामं केली आहेत, सरकारनं कामं केली आहेत. या निवडणुकीत दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.