Download App

Chinchwad Bypoll : लक्ष्मण जगताप यांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्यासाठीच निवडणुकीत उतरलो!

  • Written By: Last Updated:

पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारात मुलगी ऐश्वर्या जगताप (Aishwarya Jagtap) आणि पुतणी राजश्री जगताप (Rajshri Jagtap) या दोघीही उतरल्या आहेत. सभा, वैयक्तिक गाठीभेटी यामधून त्या जोरदार प्रचार करत आहेत. लक्ष्मण भाऊंनी पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाहिलेले कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे ऐश्वर्या जगताप यांनी सांगितले.

लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे आम्हाला पुरेसे रडू पण दिले नाही. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. ज्या कारणाने भाऊंचे निधन झाले. त्यावर उपचार घेण्यासाठी आम्हाला परदेशात जावे लागले, अशी खंत व्यक्त करत मुलगी ऐश्वर्या आणि पुतणी राजश्री सांगतात की, भाऊंनी आपल्या पिंपरी-चिंचवड करांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधानी युक्त असे कॅन्सर हॉस्पिटल उभरायची पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दुःख विसरून यात उतरलो आहे.

ऐश्वर्या जगताप सांगतात की, भाऊंचा वाढदिवस म्हणजे एक प्रकारे उरुसच असायचा. त्यांनी वाढदिवस नेहमी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर साजरा केला. यावर्षी तसेच काहीच झाले नाही. कारण चालता-बोलता आमचे भाऊ आमच्यातून निघून गेले. त्यामुळे यंदा असे काहीच करता आले नाही. त्यामुळेच भाऊ तुमची जयंती कशी साजरी करू, असे पत्र लिहिले होते.

भाऊंच्या आठवणींना उजाळा देताना राजश्री जगताप सांगतात की, आमचे एकत्र कुटुंब आहे. आम्ही सहा भावंड एकत्रच वाढलो. भाऊंनी कधीही दुजाभाव केला नाही. किंवा हे माझे पप्पा… ते तुझे पप्पा असे कधीही वातावरण आमच्याकडे नाही. तर आम्ही भाऊंना मोठे पप्पा, वडिलांना बापू तर छोटे काकांना छोटे पप्पा असेच हाक मारायचो. भाऊंनी देखील कोणतीही गोष्ट अथवा खाऊ आणला तरी सहा भावंडासाठीच आणायचे. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टीत भरपूर आनंद वाटायचा. वारकरी कुटुंब आमचं पण सुपारीचे साधं व्यसन नसलेल्या आमच्या कुटुंबात भाऊंना कॅन्सर होतो, हे आम्हाला धक्का देणारं होतं.

तर ऐश्वर्या जगताप सांगतात की, उपचारासाठी आम्हाला बऱ्याचदा अमेरिकेला जावे लागले. अमेरिकेतील कॅन्सर सेंटर सारखे सेंटर आपल्याकडे कसे उभारता येईल याचा अभ्यास करायला मला भाऊंनी सांगितले होते. ते बरे झाल्यानंतर आम्ही त्यासाठी प्रयत्न सुरु करणार होतो. मात्र, ते इतके अचानकपणे निघून गेले. त्यामुळे ते स्वप्न अर्धवटच राहिले. आता आम्ही ते स्वप्न करणार आहोत. म्हणूनच मी माझ्या प्रचार सभा, वैयक्तिक गाठीभेटीत प्रत्येकाला याबद्दल सांगत आहे.

काही लोकांनी मध्ये जगताप कुटुंबात वाद, भांडण आहे. पण हे वावटळ होतं. विरोधकांना चर्चा करण्यासाठी काहीतरी लागते तसेच ते आमच्या कुटुंबाबद्दल बोलत असतील. कारण आम्हाला भाऊंनी हीच शिकवण दिली आहे. एखाद्याने गाई मारली म्हणून आपण वासरू मारायचे नाही. त्यामुळे त्या चर्चाना उत्तर देत नाही. आमच्या कुटुंबात कोणत्याच प्रकारचा वाद नाही, असे ऐश्वर्या जगताप आणि राजश्री जगताप सांगतात.

Tags

follow us